यशवंत ' मध्ये ग्रंथालय सत्रारंभ कार्यशाळा उत्साहात संपन्न

नांदेड:(दि.७ सप्टेंबर २०२४)

          यशवंत महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाद्वारे आयोजित सत्रारंभ कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ग्रंथालय तोंडओळख व ग्रंथालयाच्या सोई-सुविधाची माहिती व्हावी; याकरिता 'ग्रंथालय संसाधने, माहिती, जागरूकता, संगणकीकृत ग्रंथालय तालिका व ई-संसाधनांचा वापर'  या विषयावर तीन सत्रात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.   

           सकाळच्या प्रथम सत्रात विज्ञान शाखा, द्वितीय सत्रामध्ये वाणिज्य शाखा आणि तृतीय सत्रामध्ये कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी माहिती-संप्रेषण तंत्रज्ञान प्रयोगशाळा येथे प्रस्तुत कार्यशाळा संपन्न झाली. 

          या कार्यशाळेत ग्रंथपाल डॉ. कैलास एन.वडजे यांनी, विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची रचना, ग्रंथसंग्रह, ई-वाचनसाहित्य, नियतकालिके, संशोधन पत्रिका व ग्रंथालयाच्या सोई-सुविधांची सविस्तरपणे माहिती दिली. ग्रंथालयामार्फत सुरु असलेल्या ऑनलाईन सेवा, संगणकीकृत ग्रंथतालिका (वेबओपेक), एन-लिस्ट व ई-संसाधने याबद्दल सविस्तर माहिती दिली व याचा वापर वर्षभर कसा करता येतो, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दर्शवून प्रत्यक्ष मोबाईलवर त्याचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण दिले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना महाविद्यालय व ग्रंथालय वेबसाईटद्वारे ई-संसाधने कसे वापरावीत, याचेही प्रशिक्षण देण्यात आले.

           विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्रामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

          अध्यक्षीय समारोपात माजी  प्र-कुलगुरु तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, महाविद्यालय ग्रंथालयामार्फत उपरोक्त सर्व सोयीसुविधा विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध आहेत. त्याचा  शैक्षणिक विकास व स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीत पुरेपूर लाभ घ्यावा तसेच पारंपारिक ग्रंथालय संसाधने व ई-संसाधने याचा समतोल साधून जास्तीत जास्त शैक्षणिक प्रगती साधावी व भ्रमणध्वनीला  ई-संसाधनाचा खजिना बनवावा, असे आवाहन केले.

          प्रारंभी प्रास्ताविकात समन्वयक प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.एस. ननवरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. 

          याप्रसंगी उपप्राचार्य तथा वाणिज्य विभागप्रमुख डॉ. एच.एस.पतंगे, प्रा. भारती सुवर्णकार, डॉ.डी.डी.भोसले, डॉ. ज्ञानेश्वर पपुलवाड, डॉ.संतोष पाटील, इतर प्राध्यापक वृंद, ग्रंथालय कर्मचारी श्री.इतबारे व श्री.अलुरवाड तसेच बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

          शेवटी आभार प्रा.भारती सुवर्णकार यांनी मानले.

           कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या