मुंबई पोर्ट प्राधिकरण वैद्यकीय खात्याच्या अधिपत्याखाली साफसफाईचे काम करणारे कंत्राटी कामगार आपल्या तीन महिन्याच्या वेतन थकबाकी साठी १ जुलै २०२४ पासून संपावर गेले आहेत.
वैद्यकीय खात्यातील साफसफाईचे कामगार बहुसंख्येने सेवानिवृत्त झाल्यामुळे या खात्याच्या अधिपत्याखाली साफसफाई करण्यासाठी KHFM हॉस्पिटॅलीटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड या ठेकेदाराला कंत्राट दिले आहे. पूर्वी हे काम सुमित ठेकेदार करीत होता.
कंत्राटदारामार्फत कामगार तेजस नगर, सद्भावना, गिरीनगर, वडाळा जुनी वसाहत, झकेरीया बंदर, माझगाव डॉक कॉलनी, वरळी कॉलनी, पॅन्टन बंदर या वसाहतीमध्ये साफसफाईचे काम करतात. कंत्राटी कामगार कॉलनी मधील रहिवाशांच्या घरातून कचरा घेऊन येणे, कॉलनीतील कचरा झाडू मारून जमा करणे, सर्व कचरा महानगरपालिकेच्या कचरा गाडीपर्यंत पोहोचविणे, इत्यादी प्रकारची विविध कामे करतात.
कंत्राटदराने काम करीत असलेल्या कामगारांना एप्रिल, मे व जून २०२४ या ३ महिन्याचा पगार दिलेला नाही. तरी देखील कामगार विनावेतन ३० जून २०२४ पर्यंत काम करीत होते. परंतु तीन महिन्याचे कंत्राटदाराने वेतन न दिल्यामुळे १ जुलै २०२४ पासून कामगारांनी साफसफाईचे काम बंद केले आहे.
कामगारांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनकडे तक्रार केल्यानंतर, युनियनने ताबडतोब या कंत्राटी कामगारांची गंभीर दखल घेऊन चेअरमन राजीव जलोटा यांना लेखी पत्र दिले. त्याचप्रमाणे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्याशी देखील युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, उपाध्यक्ष शीला भगत व प्रदीप नलावडे यांनी बोलणी करून, सफाई कामगारांना ताबडतोब तीन महिन्याचे वेतन द्यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. परंतु अद्यापही कंत्राटदार मालकानी या कामगारांना वेतन न दिल्यामुळे सफाई कामगारांनी काम बंद केले आहे. संपामुळे पोर्ट ट्रस्ट वसाहतीमधून कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून पावसाळा असल्यामुळे रोगराई पसरण्याची मोठी भीती आहे. तरी मुंबई पोर्ट प्रशासनाने या गंभीर विषयात ताबडतोब लक्ष घालून, कंत्राटदार मालकाला तीन महिन्याचे पगार ताबडतोब देण्यास सांगावे. अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी मुंबई पोर्ट प्रशासनाकडे केली आहे.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
addComments
टिप्पणी पोस्ट करा