नवी मुंबईत बल्लाळेश्वर पतसंस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा संपन्न



महाराष्ट्रात  २० हजार सहकारी पतसंस्था असून ९० हजार  कोटीच्या ठेवी आहेत. या संस्थांमधून सभासदांनी २२ हजार कोटी कर्ज घेतले आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२  कोटी असून  त्यापैकी ३  कोटी या संस्थांचे सभासद आहेत. याचाच अर्थ  २५ टक्के सभासद सहकार चळवळीशी जोडलेले आहेत.  त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळ  फार मोठी आहे. बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेसारख्या अनेक पतसंस्थांचे कार्य खूप चांगले आहे.  असे स्पष्ट उद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे वरिष्ठ निबंधक  श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले.

बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई या संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा  ०६ जून २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली  वाशी येथील  विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला. 

 श्रीकृष्ण वाडेकर आपल्या मार्गदर्शन पर भाषणात  पुढे म्हणाले की, बल्लाळेश्वर सहकारी  पतसंस्थेच्या छोट्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. सहकारी संस्थांमध्ये काम करताना कार्यकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे. चुकीचे काम करता कामा नये. आम्ही  नेहमी चांगले मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे आर्थिक साक्षरतेचे वर्ग घेतो.  काय चुकलं तर आम्हाला सांगत जा,  असे हिमतीने सांगणारे  संचालक आपल्या संस्थेमध्ये आहेत. याचा अर्थ आपला कारभार चांगला चालला आहे.  याचा मला  निश्चित अभिमान वाटतो.  

सदर कार्यक्रमाप्रसंगी  श्रीकृष्ण वाडेकर यांच्या शुभहस्ते रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यात स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे  संचालक व कुलस्वामी को ऑप क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे,  साईप्रेरणा को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे संस्थापकीय अध्यक्ष  देवदास  डोंगरे, बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे, संचालक व स्मरणिकेचे संपादक वसंत गावडे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.  याप्रसंगी  विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक व अधिकारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद गावडे, उपाध्यक्ष  भगवान शेटे, संचालक सुरेश गावडे, बाबुरावशेठ डोंगरे,  वसंत गावडे, मनोहरशेठ डोंगरे, दामाजी डोंगरे, रमेश धुमाळ,  शरद डोंगरे,  नरेंद्र तांबोळी, जगन्नाथ दाते, उमेश डोंगरे,  दैवत डोंगरे, बाळासाहेब डोंगरे,  प्रदिप नवले, संचालिका सौ. निता गावडे, सौ. सुनिताताई डोंगरे, संचालक खंडूशेठ आहेर, संचालक हर्षल आहेर व सरव्यवस्थापक  संजय घोगरे व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.  सदर कार्यक्रमाला मुंबई, नवी मुंबई व ठाणे विभागातील हजारोंच्या संख्येने सभासद उपस्थित होते.

संस्थेचे सभासदानी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  ज्येष्ठ पत्रकार रवि आमले,  उद्योजक गणपत कोरडे, हनुमंत रांजणे, लावणी सम्राट  आशीमिक कामठे अशा भूमिपुत्रांचा शाल,  पुष्पगुच्छ व  स्मृतीचिन्ह देऊन  सन्मान केला. सदर कार्यक्रमानिमित्त "कमलआनंद कलामंच प्रस्तुत वारसा माझ्या महाराष्ट्राचा" "बालगंधर्व पुरस्कार विजेते, नवी मुंबई लावणीसम्राट  आशीमिक आनंद कामठे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा बहुसंख्य सभासदांनी उपस्थित राहून आनंद घेतला. 

बल्लाळेश्वर पतसंस्थेचे २४ हजार  सभासद आहेत. संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात रु. १५१ कोटी खेळत्या भांडवलाचा टप्पा पार केला आहे. तर  ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेने रु. २२१ कोटींचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला आहे.

बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या आज  १४ शाखा असून,  संस्था मुंबई, नवी मुंबई व पुणे ग्रामीण या तीन विभागनिहाय कार्यरत  आहेत. संस्थेच्या सर्व शाखा कोअर बँकिंग संगणक प्रणालीमुळे एकमेकांशी ऑनलाईन पद्धतीने जोडल्या गेल्या आहेत.

बल्लाळेश्वर पतसंस्थेचे सुविद्य संचालक मंडळ, कार्यतत्पर व कुशल कर्मचारी वर्ग व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी एकत्रितपणे केलेल्या  कार्यामुळे संस्थेच्या क्वालिटी बैंकिंगला शासकीय लेखापरीक्षकांनी सातत्याने संस्थेस अ वर्ग प्रदान केलेला आहे. बल्लाळेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून जवळपास १०० कुटुंबाना रोजगार उपलब्ध झालेला आहे.

बल्लाळेश्वर पतसंस्थेने फक्त आर्थीक व्यवहार न पाहता सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे. संस्था सभासद व त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि समाजासाठी वेगवेगळी उपक्रम सदैव राबवीत असते. संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, वह्या वाटप, शालेय बंग वाटप असे अनेक उपक्रम संस्था सदैव राबवित असते. तसेच वृद्धाश्रमात राहणाऱ्या वयस्कर वृद्धांसाठी कायमस्वरूपी गरम पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सौर पॅनलची व्यवस्था संस्थेने करून दिली आहे तसेच शिक्षण संस्थेस संगणक वाटप देखील केलेले आहे. प्रत्येक वर्षी उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. बल्लाळेश्वर हि पतसंस्था नाही तर हे एक बल्लाळेश्वर कुटुंब असल्याची जाणीव सभासदांमध्ये निर्माण झाली आहे. संस्थेने वैद्यकीय शिक्षण स्मृती ठेव योजना व सभासद कल्याणनिधी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक सभासद यांच्या वैद्यकीय उपचारासाठी लाखो रुपयांची मदत संस्थेने केलेली आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट पतसंस्थांना सहकार क्षेत्रातील मानला जाणारा बैंको पतसंस्था पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो. रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेच्या चांगल्या कार्यामुळे सन २०२३ चा बँको पुरस्कार बल्लाळेश्वर पतसंस्थेला प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री श्री. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संस्थेला आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार २०२३ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

शेवटी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष  आनंद सबाजी गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढील काळात जास्तीत जास्त शाखा विस्तार करणार असून उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे व सन्माननीय सभासदांचे आभार व्यक्त केले.

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या