छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत स्वराज्य निर्मिती केली* -श्री संतोष देवराये


नांदेड:(दि.६ जून २०२४)

          मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील शिवराज्याभिषेक ही एकमेव महत्त्वपूर्ण घटना आहे. जगातील विकसित देशातील विद्यापीठासहित ११२ देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा व युद्धनीतीचा अभ्यास आणि संशोधन केले जाते. सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मिती केली. स्वराज्यामध्ये सैनिकांच्या निवडीकरिता जात किंवा धर्म हा निकष नसून स्वराज्यावरील निष्ठा हा निकष होता. छत्रपती शिवरायांनी प्रत्येक लढाई मानसशास्त्रीय पातळीवर लढली. तलवारीच्या टोकावर व मावळ्यांच्या प्रेमावर स्वराज्य निर्मिती झालेली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिववक्ते श्री.संतोष देवराय यांनी केले.

           श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

           याप्रसंगी विचारमंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे यांची उपस्थिती होती. 

           प्रारंभी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत संगीत विभागप्रमुख डॉ. शिवदास शिंदे, प्रा.संगीता चाटी, डॉ. दिपाली नालमवार आणि संघ यांनी उत्कृष्टरित्या सादर केले. व्याख्यानाचे प्रास्ताविक डॉ.शिवराज बोकडे यांनी केले.

           याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी माणसे जगायलाच नाही तर मरायला सुद्धा तयार होती. छत्रपती शिवरायांची भूमिका समतावादी, ममतावादी व न्यायवादी होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य  महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील. शिवराज्याभिषेक समता आणि न्याय या दोन तत्त्वावर आधारित होते, असे मनोगत व्यक्त केले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. साईनाथ बिंदगे यांनी केले तसेच आभार देखील मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली.

            व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी डॉ.दिगंबर भोसले, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, गणेश विनकरे, श्रीकांत गायकवाड, प्रदीप नरवाडे यांनी सहकार्य केले. 

          याप्रसंगी डॉ.संजय जगताप, डॉ.दीप्ती तोटावार, प्रा.भारती सुवर्णकार, प्रा.प्रियंका सिसोदिया, डॉ.शिवराज शिरसाट, डॉ. सविता वानखेडे, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, डॉ. बालाजी भोसले, डॉ.विजय भोसले, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा.नयना देशमुख, डॉ.अजय गव्हाणे आदींसह इतिहास आणि संगीत विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या