कष्टकऱ्यांचा व्यथा वेदनेचा वेद बनलेली कविता : 'घामाचे संदर्भ' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

 

कार्ड पंच करताना

मनाच्या लॉकरमध्ये

गुंडाळून ठेवतो कविता

आठ तासांसाठी. 

मी औकात विसरत नाही'

ह्या ओळी म्हणजे कष्टकरी-कामगारकवी किरण भावसार यांचे काव्यमय आत्मकथनच आहे. आपण कवी आहोत, याचा त्यांना अहंकार नाही आणि कामगार असल्याचा खेद किंवा खंतही नाही.

नुकताच त्यांचा 'घामाचे संदर्भ' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.

'हाताला पडलेल्या घट्ट्यांतून

होत असते राष्ट्राची उभारणी'

'श्रममेव जयते'चा संदेश देणारा, कवीच्या ठायी असलेला हा आत्मविश्वास फारच महत्त्वाचा आहे.

कवीचे मित्र कवीला वर्षांगणिक वाढलेल्या आपल्या प्रॉपर्टीच्या गोष्टी सांगतात आणि कवी त्यांना शब्दांच्या आणि पुस्तकांच्या गोष्टी सांगतो.

'शब्दांत रमलेला मी

सुखी आहे घामाच्या पैशात

कविकुळाला कसा लावू बट्टा?

सांगा तुकोबा...'

अशा शब्दांत कवीने जगद्गुरू तुकारामांशी संवाद साधला आहे.

ही समाधानी वृत्ती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता हेच या कवीच्या सुखी जीवनाचे गुपित आहे. 

औद्योगिक कामगारांच्या आयुष्यात फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि नाईट शिफ्ट या शब्दांना फारच महत्त्व असते. एका मागोमाग उगवणा-या ह्या शिफ्टमध्ये कवीला यंत्रांसोबत बांधून घ्यावे लागते. कोणत्याही विमाकवचाशिवाय त्यांना दिवसरात्र खपावे लागते, राबावे लागते. कारण भूक लाचार असते, हे त्यांना माहीत आहे. त्यांना हेही माहीत आहे, की 'सिक्स पॅकचं भूषण नसतं भुकेल्या पोटाला'. अशा अपरिहार्य परिस्थितीत

'आयुष्य म्हणजे

फक्त तीन शिफ्ट का?'

हा प्रश्न कवीला अस्वस्थ करतो आहे.

औद्योगिक कामगार

'गेटमधून आत शिरताना 

यंत्रांसोबत यंत्र होतात' 

हे कवीचे वस्तुनिष्ठ निरीक्षण आहे.

नवनिर्माण करणारे हे कामगार कोणाच्याही खिजगणतीत नसतात. यंत्रांसोबत यंत्र झालेल्या कामगारांची परिस्थिती जनावरांपेक्षा फारशी वेगळी नाही, हेही कवी मोठ्या खेदाने नमूद करतो. 

'वारी' ह्या अभंगरचनेत कवीने श्रमिकांची श्रमनिष्ठा फारच चपखल शब्दांत वर्णन केली आहे :

'रोज करू आम्ही 

आठ तास वारी

कामात श्रीहरी 

पाहू सदा'. 

कामात राम शोधण्याची नैष्ठिक वृत्ती कामगारांच्या ठायी आहे, म्हणूनच आज जगाची देदीप्यमान प्रगती दिसते आहे. 

भंगार गोळा करणारा कामगारही कवीला आपला जवळचा भाईबंद वाटतो. त्याच्या श्रमाघामाचा सुगंध ह्या कवितेला आहे.

त्याच्या कष्टाचे कौतुक करताना कवीने लिहिले आहे :

'भंगाराच्या ढिगाआडून

उद्याचा सूर्य

सोनं पेरीत उगवेल. 

शिकलेलं वाया जात नाही. 

त्याला खातरी आहे

उकिरड्याचेही पांग फिटतात!'

आजच्या प्रतिकूलतेतून उद्या काही चांगलेच घडेल, असा दुर्दम्य आशावाद कवीने व्यक्त केला आहे.

हल्ली हवामानबदलामुळे शेती पिकत नाही. यांत्रिकीकरणामुळे शेतकरी आणि शेतमजुरांना शेतीत काम उरले नाही. शेतीमालाला भाव नसल्यामुळे कष्टाचा पुरेसा मोबदला मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांची पावले रोजगार मिळवण्यासाठी औद्योगिक वसाहतींकडे वळली आहेत. इथेही त्यांच्या आयुष्याचा गोठाच होतो. त्यांच्या आयुष्याची अवस्था तळ झिजलेल्या चपलांसारखी होते. 

'शेतीच्या बांधावरच

मानपान गुंडाळून ठेवून

थेट कंपन्यांच्या गेटवर

भरतीचे बोर्ड धुंडाळत

तो फिरत असतो...

आत्महत्येला पर्याय म्हणून!'

कारखाना असो की शेती, कष्टकऱ्यांसाठी नेहमी 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' अशीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांवर आणि शेतमजुरांवर बिबटे, रानडुकरे, अस्वलं रोज हल्ले करत आहेत. तिथेही भुकेचा लपंडाव चालूच आहे. म्हणून कवी लिहितो:

'अलीकडे रानात 

पिकांपेक्षा जास्त

हिंस्र सुळेच उगवून येत आहेत'. 

आजवर शेतीमातीची कविता लिहिणा-या कवींनी शेतकरी मायबापाचे ढोरकष्ट शब्दबद्ध केले. त्यांच्या कवितेत इतर क्षेत्रातील कामगारांचे दु:ख फारसे डोकावले नाही. तथापि औद्योगिक क्षेत्रात कार्यरत ह्या कवीने सर्वच क्षेत्रांतील कामगारांचे दु:ख आपल्या कवेत घेतले आहे. यावरून ह्या कवीची सहसंवेदना आणि अनुभवविश्व किती व्यापक आहे, हे आपल्या लक्षात येते. 

'माफ करा सुर्वे' ह्या कवितेत कवीने कामगार विद्यापीठाचे कुलगुरू नारायण सुर्वे यांच्याशी संवाद साधला आहे.

आम्ही कामगारांनी स्वतःला शोषकांच्या दावणीला बांधून घेतले आहे, असा प्रांजळ कबुलीजबाब दिला आहे.

'हैंग झालेल्या आमच्या मेंदूत

कोण पेरील आता तुमच्यासारखे

झोतभट्टीत शेकलेले पोलादी विचार?'

असा प्रश्नही उपस्थित केला आहे. कामगारविश्वातील साचलेपणाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. 

पाथरवट हा दगडातल्या देवाचा निर्माता असतो. त्याची सर्जनशीलता अधोरेखित करताना कवीने लिहिले आहे :

'दैवाला फाट्यावर मारून

दगडाला आकार देत

ते देव घडवतात

रस्त्याकडेच्या पालात राहून'.

'हीच पालं आपलं नशीब

घडवीत बसतात निर्विकारपणे

छन्नी हातोड्यांच्या गजरात'. 

अशा शब्दांत कवीचा कठोर मेहनतीवरचा दृढ विश्वास व्यक्त झाला आहे. 

कामगार टोलेजंग इमारती बांधतात, पवित्र मंदिरे बांधतात, विधिमंडळे आणि न्यायमंदिरेही बांधतात. ते सगळ्यांना प्रस्थापित करतात आणि स्वतः मात्र बिनबोभाटपणे विस्थापित होतात. म्हणून कवीने सहज, साधा, सोपा आणि सगळ्यांना निरुत्तर करणारा प्रश्न उपस्थित केला आहे :

'ताजमहाल बांधणाऱ्या कामगारांचं

पुढं काय झालं?'

हा प्रश्न वाचकांना अंतर्मुख करून जातो. 

जगाचे पोषण करणारा अन्नदाताच शेवटी उपाशी राहतो, हे कटुवास्तव कवीने एका दृष्टान्तातून पुढे मांडले आहे :

'पिझ्झा डिलीव्हरी करणारा मुलगा 

धावपळीत जेवलाच नाही सकाळपासून'. 

आपल्या समाजव्यवस्थेत बाईचे कष्ट नेहमीच उपेक्षित, दुर्लक्षित राहिले आहेत. तिच्या कष्टाची कधीच कदर झाली नाही. बाई बसत नाही आणि तिचं काम दिसत नाही, असे नेहमीच म्हटले जाते. ह्या बाया अंबाड्यात गरिबी माळून अहोरात्र राबत असतात. अशा बाईच्या उपेक्षित कष्टांची कदर कवीने केली आहे :

'बाई झटते। दैन्य हटते

दोन वेळा। चूल पेटते'. 

आजवरच्या व्यवस्थेने नजरअंदाज केलेल्या बाईच्या कष्टांचे मोल कवीने केवळ आठ शब्दांमध्ये अतिशय प्रभावीपणे अधोरेखित केले आहे. 

अलीकडे आपल्या कल्याणकारी सरकारने 'पर्मनंट' हा शब्दच हद्दपार केला आहे. सर्वच क्षेत्रांतील कर्मचारी आणि कामगारांच्या आयुष्यातील 'कायम' ह्या शब्दाचे सुरक्षाकवच हिरावून घेतले आहे. ह्या परिस्थितीवरचे कवीचे कडवट भाष्य भलतेच भेदक आहे :

'शिक्षण कंत्राटी, कामं कंत्राटी, 

जगणं कंत्राटी, अख्खा देश कंत्राटी' 

अशा शब्दांत कवीने अशाश्वत असे समकालीन समाजवास्तव मांडले आहे. 

ह्या कवितेत कामगारजीवनाशी संबंधित मॅनपॉवर, मस्टर, टाईम कीपर, स्टाफ, बिनपगारी, मशीन, धूर ओकणारी चिमनी, ओव्हर टाईम, कंपन्या, हाताला पडलेले घट्टे, स्फोट, इनपुट, आऊटपुट, रोजंदारी, बेरोजगारी, पर्मनंट, वेल्डिंग, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, रात्रपाळी, रिलीव्हर, भंगार, जेसीबी, पोकलेन, सिमेंटच्या गोण्या, कॉंक्रीट, यमायडीसी, मालधक्का, यांत्रिक कोलाहल, पेटलेल्या भट्ट्या, गजबजाट, खडखडाट, रोगट हवा, प्रदूषण, धुरकट, कळकट, कष्टाळू पेशी, उष्माघात, पहिल्या पाळीचा भोंगा, स्क्रॅप यार्ड, वायरमन, ड्रायव्हर, किन्नर, हमाल, सेंटरिंग, कटिंग, पॅकिंग, स्विपिंग, बफिंग, लेथ मशीन, बॉयलर, छिन्नी- हातोड्यांचे घाव, सेफ्टी हेल्मेट, मार्च एंड, पगार, बोनस, बक्षिसी, बिदागी, ॲमिनिटीज, ब्रॅण्डेड, साप्ताहिक सुट्टी इ. शब्द वारंवार येतात. हे शब्द वाचकाला त्या वातावरणाशी जखडून ठेवतात. 

कवी किरण भावसार हे औद्योगिक कामगार असले, तरी त्यांनी परदु:ख शीतळ मानून, आपल्या कवितेत केवळ औद्योगिक कामगारांचीच दु:खे मांडली नाहीत, तर शेतकरी, शेतमजूर, ऊसतोडणी कामगार, हॉटेलच्या भट्टीवर भूक भाजणारे आचारी, खरकटी भांडी धुणारे कामगार, टेबलावर फडकं मारणारा पो-या, काच-पत्रा-भंगार गोळा करणारे, सेंटरिंग ठोकणारे, कॉंक्रीट कालवणारे, रस्तेबांधणी करणारे कामगार, विविध वाहने चालवणारे ड्रायव्हर, क्लीनर, हमाल, बांधकाम मजूर, कापड दुकानात काम करणारे कामगार, परप्रांतीय भैय्ये, रोजंदारीवरच्या बाया, चहाची टपरी चालवणारे, रंगकाम करणारे, दगडकाम करणारे पाथरवट, रात्रभर गस्त घालणारा गुरखा, पिझ्झा बॉय, कुल्फी विकणारी मुले, गटारी साफ करणारे, फटाक्यांच्या कारखान्यात काम करणारे, विहिरी खोदणारे इ. कामगारांच्या घामाचे संदर्भ ह्या कवितेत मोठ्या ताकदीनिशी उतरले आहेत. 

नारायण सुर्वे यांच्या ओजस्वी आणि तेजस्वी कवितेची परंपरा पुढे चालवणारी ही कविता कामगारांच्या वेदनेचा वेद होऊन अवतरली आहे. असे असले तरी साहित्यातील गटातटाच्या राजकारणात ह्या कवितेची गंभीरपणे दखल घेतली जाईल, याची काहीच शाश्वती देता येत नाही. 

'समीक्षा सवतीसारखी

काढते उणीदुणी 

अनेकदा अनुल्लेखाचे

शस्त्र उपसते'. 

याची कवीला यथार्थ जाणीव आहे. तथापि तळपत्या तलवारीसारखी ही स्वयंसिद्ध कविता कोणत्याही पक्षपाती समीक्षेची मोताद नाही. 

प्रा. डॉ. अरुण ठोके यांनी नेमक्या शब्दांत या कवितेची पाठराखण केली आहे. 

'एका कंपनीचं बंद पडणं

टाईम कीपरच्या

हातातलं मनगटी घड्याळ 

बंद पडण्याएवढं सहज नसतं'. 

हे फक्त त्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनाच कळत असतं. त्यातून किती प्रश्न निर्माण होणार आहेत, हे त्यांनाच समजत असतं. सभोवतालची परिस्थिती अशी कितीही निराशाजनक असली, तरी कवीची मनोवृत्ती सकारात्मक आहे. ह्या सकारात्मकतेतून कवीने एक मागणे मागितले आहे :

'कुणाच्या विझू नयेत चुली

कष्टणा-या हातातलं काम

हिरावून घेऊ नये कुणी

माणूस राहावा जिवंत. 

बाकी, यंत्रयुगाचा विजय असो!'

'कामगारांच्याही वस्तीत सूर्य उगवायलाच हवा' असे शीतळ स्वप्न हा कवी पाहतो आहे. कवीचे हे महन्मंगल मागणे म्हणजे एक प्रकारचे पसायदानच आहे. कवीच्या ह्या स्वप्नसिद्धीसाठी शुभकामना!

'घामाचे संदर्भ' (कवितासंग्रह) 

कवी : किरण भावसार 

प्रकाशक : काव्याग्रह प्रकाशन, वाशिम 

मुखपृष्ठ : प्रदीप खेतमर 

पृष्ठे १०७       किंमत रु. १६०

डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज