नांदेड दि.
बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांना पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे दोन पुरस्कार मिळाले आहेत.
पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देण्यात येणा-या उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारासाठी त्यांच्या 'आभाळमाया' ह्या बालकवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. शनिवारी, राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात ज्येष्ठ साहित्यिक द. वि. अत्रे यांच्या हस्ते डॉ. सावंत यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी डॉ. सावंत यांच्या बालसाहित्याच्या क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. डॉ. सावंत यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी युगंधरा कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद ही ११८ वर्षांची समृद्ध परंपरा असलेली महाराष्ट्रातील पहिली साहित्यसंस्था आहे. दरवर्षी परिषदेच्या वर्धापनदिनी विविध वाङ्मयप्रकारांतील कलाकृतींना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतात. वि. वि. बोकील पुरस्कारासाठी डॉ. सावंत यांच्या 'एलियन आला स्वप्नात' ह्या बालकवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रविवारी, परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष समारंभात साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. माधव कौशिक यांच्या हस्ते डॉ. सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी पाटील, राजीव बर्वे, मिलिंद जोशी, अंजली कुलकर्णी, सुनीताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सुरेश सावंत यांची आजवर ५४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी ३० पुस्तके बालसाहित्याची आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या तीन पुरस्कारांसह अन्य प्रतिष्ठित साहित्यसंस्थांचे ३० पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची 'बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध' आणि 'आजची मराठी बालकविता' ही दोन पुस्तके संदर्भग्रंथ म्हणून पुणे विद्यापीठाच्या एम. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा