उमरी तालुक्यातील सर्व व्यापारी बंधूंनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठीशी उभे राहावे पालक मंत्री गिरीश महाजन

 नांदेड /प्रतिनिधी दि.19

केंद्र सरकार देशातील व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून त्यांच्या समस्या जाणून, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार  करीत आहे . देशातील सर्व व्यापारी वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहेत, उमरी तालुक्यातील सर्व व्यापारी बंधूंनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठीशी उभे राहावे व नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची संधी द्यावी असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उमरी येथील व्यापाऱ्यांच्या प्रचार सभेत केले.

नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी उमरी येथे व्यापारी बांधवांशी संवाद सभा पालकमंत्री  गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार अजित गोपछडे, मारोतराव कवळे गुरुजी, गंगाधर बंडुरे, जीवनराव घोगरे उपस्थित होते.

पुढे बोलताना पालकमंत्री  महाजन यांनी  विकसित भारत आणि जगाचा विश्वगुरू बनवण्यासाठी येणाया २६ तारखेला भाजपाला मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन  केले. देशाच्या समृद्धीसाठी, सर्वांगीण विकासासाठी  व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले.यापुढेही व्यापारी वर्गाला समाधानाने, कोणतीही भीती न बाळगता व्यापार करता यावा यासाठीही मोदी सरकारने व्यापाऱ्यांच्या  बाजूने निर्णय घेतले आहेत. देशात मोदी लाट कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून देश आर्थिक महासत्ता बनवायचा आहे ,त्यासाठी खा. चिखलीकर यांना प्रचंड मताधिक्य मिळवून द्यावे असे आवाहन पालकमंत्री महाजन यांनी केले.

यावेळी   खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले व्यापारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आपण अनेकदा यशस्वी प्रयत्न केले. उर्वरित प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण यापुढेही प्रयत्नशील राहू, आपण व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू असेही आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी व्यापारी ,भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या