मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कॉटन ग्रीन येथील राजस नगर (पूर्वीचे जकेरिया बंदर) वसाहतीमध्ये ५० वर्षांपूर्वी लहानपणी एकत्र राहणाऱ्या मित्र-मैत्रिणींचा पाचवा कौटुंबिक स्नेह मेळावा त्याच वसाहतीत रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहानपणीचे जवळपास ८० ते ९० सवंगडी यावेळेस एकत्र जमले होते. काहीजण तर सहकुटुंब आले होते. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे डेप्युटी चीफ इंजिनिअर अविनाश तांबेवाघ, उद्योगपती अविनाश कांबळे, पर्शियाना बिर्याणीचे अनुप मेजारी, हॅपी फिट टूरचे अरविंद जागडे, निर्माता दिग्दर्शक विजय सोमा सावंत,पोलीस उपनिरीक्षक दत्ता नामदास, मिलिंद जाधव, अतुल जांभळे, गायक प्रशांत पाटील, मालंडकर ज्वेलर्सचे विनोद मालंडकर, बांधकाम व्यावसायिक आसिफ खान इत्यादींचा समावेश होता. आपल्या जुन्या मित्रांची भेट घेण्यासाठी व्यंकटेश कर्नाटकातून, उद्योगपती कोळपे बंधू पुण्यातून, तर शौकत पटेल खास हैदराबादहून आले होते. सध्या हे सर्व मित्र मैत्रिणी ५० ते ६२ या वर्षांचे आहेत. सात वर्षांपूर्वी लहानपणीच्या या सर्व मित्र-मैत्रिणींनी एकमेकांशी संपर्क साधून, लहानपणी राहत असलेल्या ठिकाणी एकत्र भेटण्याचे ठरवले व या स्नेहसंमेलनास सुरुवात झाली. कोविड संसर्गाचा मधला दोन वर्षांचा काळ सोडला तर, हा सोहळा सलग सुरू आहे. गाणी, लहानपणीचे तेच खेळ, तीच धमाल, तीच मस्ती, तोच पोरकटपणा, तीच टोपण नावे या सर्व गोष्टींनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत, संगीत खुर्ची, क्रिकेट, पुरुष व महिला मॅरेथॉन स्पर्धा असे विविध खेळ घेऊन या दिवसाचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला. पूर्वी राहत असलेल्या आपल्या घरांना भेटी देऊन प्रत्येक जण आपल्या आठवणींना उजाळा देत होता. मुंबई पोर्ट प्रशासनाचे सहकार्य लाभलेल्या, सकाळच्या अल्पोपहारापासून ते संध्याकाळचा एकमेकांचा भावनिक निरोप घेईपर्यंतच्या या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आयोजन करण्यासाठी विजय सोमा सावंत, प्रशांत पाटील, जयनारायण सिंग, निसार पठाण, अभय मेजारी, अरविंद जागडे, डॉक्टर कल्पना वारंग, शकील खान, सुहास सरफरे, मारू इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. संध्याकाळी कार्यक्रमाच्या शेवटी सन्मान सोहळा व दिवसभराच्या खेळांचा बक्षीस समारंभ, मुंबई पोर्ट ट्रस्टचे वेल्फेअर सुप्रीटेंडंट तानाजी गायकवाड व सुप्रसिध्द पत्रकार मारुती विश्वासराव यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी मारुती विश्वासराव यांना पत्रकारितेतील आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा