मराठा वंशावळ जुळविण्याबाबत कार्यवाहीसाठी समिती गठीत


किनवट,दि.15 (प्रतिनिधी) : मराठा वंशावळी जुळविण्याकरीता पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा असे पुरावे कशा प्रकारे उपलब्ध करून घ्यावेत, याबद्दल अर्जदारास माहिती नाही, अशा प्रकरणात निर्णय घेऊन साहाय्य करण्यासाठी शासननिर्देशानुसार किनवट येथे तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या अध्यक्षतेसाठी तालुकानिहाय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सोबतच, वंशावळी जुळविण्याकरीता जिथे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा असे पुरावे कशा प्रकारे उपलब्ध करून घ्यावेत, याबद्दल अर्जदारास माहिती नाही, त्यांच्या मदतीसाठी नायब तहसीलदार अनिता कोलगणे यांच्या अध्यक्षतेखाली  "कुणबी जात प्रमाणपत्र वंशावळ कक्ष" स्थापन करण्यात आलेला आहे.
        शासननिर्णयान्वये मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कुणबी जाती संदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळातील झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या समदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंती उपरोल्लेखित जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी मा. न्यायमुर्ती संदिप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणे बाबत निर्देश दिले आहेत.
         त्या अनुषंगाने मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याची सध्याची कार्यपध्दती कायम ठेवुन ज्या व्यक्तींची वंशावळ स्पष्ट जुळते त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात यावेत. या प्रस्थापित पध्दतीत कोणातही बदल न करता कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदी संदर्भात वंशावळ सिध्द करण्यासाठी तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात सदस्य म्हणून
गट विकास अधिकारी ए.जी.राठोड, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, गट शिक्षण अधिकारी डी. आर. बने, जिल्हा जात पडताळणी समिती नांदेड येथील संशोधन अधिकारी शिवानंद मिनगिरे, मोडी लिपी तज्ज्ञ डॉ.कामाजी डक आणि सचिव म्हणून नायब  तहसीलदार  अनिता कोलगणे यांचा समावेश आहे.
         तसेच वंशावळी जुळविण्याकरीता जिथे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा असे पुरावे कशा प्रकारे उपलब्ध करून घ्यावेत, याबद्दल अर्जदारास माहिती नाही, त्यांच्या मदतीसाठी "कुणबी जात प्रमाणपत्र वंशावंळ कक्ष" स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षाच्या प्रमुख नायब तहसीलदार अनिता कोलगणे असून, त्यांच्या साहाय्यासाठी अव्वल कारकून कैलास श्रोते, महसूल सहाय्यक सविता रणखांब व अनिल सूर्यवंशी, कोतवाल रामकिशन गेडाम व रविदास आडे यांची या समितीत नेमणूक करण्यात आली आहे.
टिप्पण्या