आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिनचर्या महत्त्वाची* डॉ .मीनाक्षी बांगर


नांदेड: नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात डॉ.मीनाक्षी बांगर प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आजकाल आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत त्याचा परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो आणि आपण आजारी पडतो. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर आपण आपली दिनचर्या व्यवस्थितपणे सांभाळली पाहिजे. त्या म्हणाल्या की दिवसातील 24 तासांपैकी त्याचे तीन टप्प्यात आपण विभाजन केले पाहिजे. त्यातील आठ तास स्वतःच्या वैयक्तिक आवडीसाठी, आठ तास नोकरी व्यवसायासाठी आणि आठ तास शांत झोप घेण्यासाठी.असे केले तरच आपले आरोग्य चांगले राहील आणि आपणास डॉक्टर कडेही जाण्याची गरज पडणार नाही. पण या सर्व गोष्टींमध्ये सातत्य असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण केवळ आरंभशूर असता कामा नये. कोणत्याही गोष्टीत सातत्य असेल तरच आपण निश्चित यश मिळवू शकतो. म्हणून इतर भौतिक धनसंपत्ती पेक्षा *आरोग्यम धनसंपदा* हा मंत्र आपण जीवनात पाळला तर कोणतेही यश आपणास सहज मिळू शकतो. असा संदेश याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागातील अस्वच्छतेमुळे ग्रामीण भागात साथीचे रोग पसरतात. शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबवते पण त्या प्रत्यक्षात अस्तित्वात येत नाहीत *हरघर स्वच्छालय* हा सरकारचा नारा पाहिजे तसा यशस्वी झाला नाही याचे प्रत्यंतर आपणास येते असेही त्या म्हणाल्या.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरदचंद्र महाविद्यालय, नायगाव येथील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नामदेव सानप हे होते. त्यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राधिका कोकुलवार हिने केले तर आभार संभाजी तोटरे या विद्यार्थ्याने मानले. यावेळी विचार मंचावर डॉ.दत्ता बडूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रशेखर एंगडे, डॉ.अतिश राठोड, डॉ .आशा मेश्राम हेही विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या