निष्ठा जपणारे संघर्षशील संपादक ः रूपेश पाडमुख

(आज 16 मे मंगळवार समीक्षा दैनिकाचे संपादक श्री.रूपेश पाडमुख यांचा वाढदिवस. अर्धशतकापेक्षा अधिक काळ पत्रकारिता करणारे अनुभव संपन्न ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी नव्या पिढीतील विनयशील धडाडीच्या संपादकाचा थोडक्यात करून दिलेला हा परिचय वाचकांना सादर करीत आहोत.)

प्रत्येकाच्या आयुष्यात यशस्वीतेसाठी आप-आपल्या पद्धतीने संघर्ष करावा लागतो. पार्श्वभूमी असलेल्यांना लवकर यश मिळते. पण ज्याच्या मागे कुठलीही आर्थिक, वृत्तपत्र क्षेत्रातील किंवा राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ स्वकर्तृत्वावर अविरतपणे परिश्रम करून विपरीत परिस्थितीवर मात करत स्वतःचे अस्तीत्व निर्माण करण्यासाठी एकाकी झुंज देत तुफानातील दिवा ठरत असलेला उपक्रमशील संपादक रूपेश पाडमुख यांचेही नाव आदराने घेणे गरजेचे वाटते.

नांदेडच्या तरुण दमदार पिढीत श्री पाडमुख यांनी दैनिक समीक्षाच्या माध्यमातून वृत्तपत्रीय जगतात जी भर घातली आहे, ती लक्षणीय आहे. दैनिक समीक्षा 8 मार्च 2008 रोजी सुरु झाले. त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून वृत्तपत्र सुरू केलेले नाही.

संपादक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना रुपेश पाडमुख यांनी अनेक सहकार्‍यांना सोबत घेऊन मंथन क्रिऐटीव्ह, पत्रकार प्रेस परिषद, मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अशा संस्था-संघटना उभ्या केल्या आहेत. या संघटनांच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात. जागतिक महिला दिनी म्हणजे दिनांक 8 मार्च रोजी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार देऊन सन्मान करीत असतात. माजी गृहमंत्री कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्त दरवर्षी देशातील नामवंत व्यक्तींचा डॉ. शंकररावजी चव्हाण गुरुरत्न पुरस्काराने सन्मान केला जातो. भाभी माँ अमीताताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्तही समाजपयोगी उपक्रम दरवर्षी राबविल्या जातात. मंथन क्रिएटिव्हच्यावतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते, रक्तदान शिबीर घेतले जाते. एवढेच नव्हे तर स्वातंत्र्य दिनी भारताच्या सिमेवर रक्षण करत असताना शहिदांना समर्पीत ऐ वतन तेरे लिए हा देशभक्ती गीतांचा कार्यक्रमही घेण्यात येतो. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा दरवर्षी सन्मान केल्या जातो.

पूर्वीच्याकाळी सिनेमाक्षेत्रात मनोजकुमार, किशोरकुमार असे काही हिरो होते की, त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये अभिनेता, कथालेखक, संवादलेखक, पटकथा लेखक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिका ते स्वत:च पार पाडत असत. म्हणून दूर गगन की छाव मे सारख्या सिनेमाबाबत सबकुछ किशोरकुमार किंवा शोरबाबत सबकुछ मनोजकुमार असे म्हटले जात असे. अगदी तसेच दैनिक समीक्षाबाबत सबकुछ रुपेश पाडमुख असे म्हणावे लागते. या अर्थाने रुपेश पाडमुख म्हणजे वन मॅन आर्मी, एकाकी लढवय्या आहे. एखाद्या वृत्तपत्रामध्ये संपादक, वृत्त संपादक, सहाय्यक संपादक, उपसंपादक, लेखक अशा अनेक जबाबदार्‍या असतात. त्या सर्वच जबाबदार्‍या एकटे रुपेश पाडमुख यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. मागील पंधरा वर्षांपासून दैनिक समीक्षाचा गाडा ते यशस्वीरीत्या हाकत आहेत.

रुपेश पाडमुख यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे वृत्तपत्र विक्रेते अर्थात हॉकर्सबद्दल असलेली आत्मीयता. वास्तविक पाहता वृत्तपत्र सृष्टीमध्ये हॉकर्स हा महत्वाचा घटक आहे, पण त्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न पाडमुख यांनी केला आहे. हॉकर्सच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. इतकेच नव्हे तर वृत्तपत्र क्षेत्रातील छायाचित्रकार, संगणक चालक, मशीन ऑपरेटर व इतर घटकांचा पुरस्कार देऊन पत्रकारदिनी सत्कार केला जातो. काही दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना त्यांनी पाच - पाच हजारांची मदत केली आहे. कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनी हॉकर्ससह वृत्तपत्र क्षेत्रातील अनेकांना मास्क व सॅनिटीझरचे वाटप केले होते. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री मदत निधीसाठी अकरा हजारांचा निधी पाडमुख यांनी दिला होता. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही कुणाला बेड, ऑक्सीजन असो की वॅक्सीन मिळवून देण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न केले. अनेकांना सत्कारातून सन्मान करून प्रेरणा देण्याच्या कामासहीत अडचणीच्या काळात हिरहीरीने धाऊन जाण्याचे त्यांच्या या उद्दात कार्यासहीत इतरही सामाजीक सेवा त्यांच्या हातून घडत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अशा या उपक्रमशील संपादकाच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!

अनिकेत कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, नांदेड.


टिप्पण्या