राम दातीर
माहूर (प्रतिनिधी)
माहूर तालुक्यातील शेती सिंचन व उन्हाळ्याच्या दिवसांत निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई लक्षात घेता वानोळा व लखमापूर( गालधरी) अशा दोन ठिकानी नव्याने सिंचन तलाव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ भीमराव केराम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन केली आहे.
माहूर तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम असलेल्या वानोळा व लखमापूर भागात पाण्याचा मुबलक स्रोत अद्यापही उपलब्ध झाला नसल्याने येथील शेतकरी व नागरिकांना शेती सिंचनाबरोबरच दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.ही बाब लक्षात घेऊन आ भीमराव केराम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन सिंचन तलावासाठी पाठपुरावा सुरु केला आहे.माहूर तालुक्यातील वानोळा हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने वानोळा येथे व वनविभागाच्या शेजारी असलेल्या लखमापूर (गालधरी) येथे नव्याने सिंचन तलाव झाल्यास परिसरातील हजारो हेक्टर शेतीक्षेत्र सिंचनाखाली येणार आहे तर तलावामुळे उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे नमूद करत दोन सिंचन तलाव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे. या मागणीला उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आ भीमराव केराम यांच्या प्रयत्नातून आता वानोळा व लखमापूर परिसरातील पाणी समस्या कायमस्वरूपी मिटण्याच्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.कोरोना काळात रखडलेला विकासात्मक अनुशेष भरून काढण्यासाठी आ भीमराव केराम यांनी मागील काही महिन्यापासून विकासकामांची घोडदौड सुरु केली आहे.

COMMENTS