मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
तालुक्यातील बेटमोगरा येथे श्री.शिवलिंग बादशाह मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरू डॉ सिद्धिदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र बारस यात्रेनिमित्त शिवकिर्तन महोत्सवासह दि.२ एप्रिल रविवार रोजी रात्री ११ वाजता भव्य कावड मिरवणूक व दि.३ एप्रिल सोमवार रोजी दुपारी ३ वाजता जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील बेटमोगरा येथील श्री.शिवलिंग बादशाह ऐतिहासिक मठ हे सर्वधर्मीय भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्ध आहे. शिवलिंग बादशाह मठ हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक मानले जाते. बेटमोगरा या गावातील अनेक जातीधर्माच्या लोकांची श्रद्धा या मठावर असल्याने येथील अनेक जातीधर्माचे लोक एकत्रित येऊन अनेक सन उत्सव साजरे करतात. त्यातलाच एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे चैत्र बारस यात्रा या यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा,आंध्र प्रदेश या राज्यांतील विविध भागातून श्रद्धाळू हजारोंच्या संख्येने येथील श्री.शिवलिंग बादशाहच्या दर्शनासाठी येतात.
यादरम्यान यात्रेनिमित्त श्री.शिवलिंग बादशाह मठ संस्थानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यात दि.३१ मार्च शुक्रवार रोजी पासून श्री.अनिल स्वामी शेवाळ यांच्या शिवकिर्तनाला सुरुवात झाली असून दि.१ एप्रिल रोजी सौ.शिवकांता सदाशिव पाटील मुखेड,दि.२ एप्रिल रोजी श्री.कैलास महाराज जामकर डोंगरगाव, दि.३ एप्रिल रोजी श्री दयानंद महाराज नागापल्ले देवर्जनकर,दि.४ एप्रिल रोजी श्री चंद्रकांत अमलापूरे गडगा यांच्या शिवकिर्तनासह दि.५ एप्रिल बुधवार रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत श्री.संगनबसव स्वामी निलंगा यांचे महाप्रसादावर किर्तन होणार आहे.तरी या उत्सवात पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे असे आवाहन श्री. शिवलिंग बादशाह मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरू डॉ सिद्धिदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांनी केले.

COMMENTS