परभणी,दि.14(प्रतिनिधी) : माजी राष्ट्रपती तथा थोर शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्य सरकारने आयोजित केलेल्या ‘पोस्टर मेकींग’ स्पर्धेत परभणीच्या सृष्टी संतोष चिद्रवार हीने प्रथम क्रमांक पटकाविला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सृष्टीचा शुक्रवारी (दि.14) मुंबईतील मंत्रालयात आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात यथोचित सत्कार करण्यात आला.
मुंबईतील जे.जे. कला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्य सरकारच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत परभणी येथील उदयोन्मूख आर्टीस्ट व जे.जे. कला महाविद्यालय मुंबईची विद्यार्थीनी सृष्टी संतोष चिद्रवार हीने शिक्षण एक शृंगार असे सुंदर पोस्टर साकारले. हेच पोस्टर बक्षीसपात्र ठरले. सृष्टीच्या या पोस्टरला प्रथम क्रमांकाचे म्हणजे 25 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट मुंबई येथील प्रा. गजानन शेपाळ, प्रा. राहूल मेश्राम, प्रा. प्रगती पाटील, प्रा. राधीका वाघमारे यांचे तीला मार्गदर्शन लाभले.
सृष्टीचे वडील हे बोरी (ता.जिंतूर) येथील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. इंग्रजीचे ते नामवंत तज्ज्ञ आहेत. आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. सृष्टी सद्या जे.जे. स्कूल ऑफ अल्पाइड ऑफ आर्ट मुंबईत द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.
सृष्टीची प्रतिक्रिया....
ज्याप्रमाणे दागिना परिधान करून एखादी व्यक्ती सुशोभित दिसते, त्याचप्रमाणे वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्त्व फुलून येते. याच विचाराला धरून मला एक वाक्य सुचले; ते म्हणजे ‘शिक्षण एक शृंगार’ हे छोटेसे वाक्य खूप काही सांगून जाते! माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम शिक्षण महत्वाचे आहे. माणूस शिक्षित असेल तेव्हाच वाचन करू शकेल. आणि जितके वाचन अधिक तितके सकारात्मक विचार! आणि माणसाचे जेवढे सुंदर विचार तेवढे त्याचे व्यक्तिमत्त्व देखिल सुंदर! तो व्यक्ती सुंदर ! अधिक सोपे करून सांगायचे झाले तर माझ्या डोळ्यासमोर सावित्रीबाई फुले आल्या. सावित्रीबाई हे सर्वांसाठीच एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा चेहरा समोर येताच प्रत्येकाला त्यांची जीवन कहाणी आठवते; त्यांनी घेतलेले कष्ट, सोसलेला त्रास, त्यावर मात करून पुढे येऊन समाजापुढे एक आदर्श ठेवलेला आपल्याला आठवतो.
- सृष्टी चिद्रवार, पारितोषिक विजेती, परभणी


COMMENTS