नांदेड: नांदेडच्या 'सिडको' परिसरातील आंबेडकरवादी 'मिशन'च्या वतीने ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता 'आंबेडकरवादी' मिशन अभ्यास केंद्रात 'यूपीएससी'त यशस्वी झालेल्या महाराष्ट्र राज्यातील १४ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
आंबेडकरवादी 'मिशन'च्या वतीने येत्या रविवारी आयोजित सत्कार सोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक म्हणून तेलंगणा राज्याचे माजी पोलीस महासंचालक टी. कृष्ण प्रसाद (आय.पी.एस) तसेच महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक डी.कनकरत्नम (आय.पी.एस) यांचेसह नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, तेलंगणाचे सनदी अधिकारी कालीचरण खरतडे (आय.ए.एस),राज्याचे माजी समाज कल्याण आयुक्त आर. के. गायकवाड (आय.ए.एस) यांचीही प्रमुख
उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास कैलास पगारे (आयएएस), परभणी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, अर्चना वानखेडे (आयएएस) अनिलकुमार मोरे (माजी सचिव ग्राम विकास), महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे व सहसंचालक उत्तम सोनकांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील 'अनुसूचित जाती' प्रवर्गामधील प्रथम मुलगी जी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेली ऐश्वर्या चिकटे तसेच ऑल इंडिया सर्विसेसमध्ये यशस्वी झालेले अनुक्रमे- सुमितकुमार दत्ताहरी धोत्रे (आय.पी.एस तसेच आय.एफ.एस) सुहास गाडे, आदित्य चंद्रभान जीवने, अमोल बोराडे, शरण गोपीनाथ कांबळे यांचेसह अजिंक्य आनंद विद्यागर, निलेश गायकवाड, रजतकुमार कुंडगीर, हेतल कैलास पगारे, डॉ. दीक्षा अरूण भवरे, स्वप्नील प्रभाकर निसर्गणे, देवव्रत वसंतराव मेश्राम, शुभम अशोक भैसारे, पियुष सुधाकर मडके तसेच शिवहरी मोरे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. डॉ. सुयश चव्हाण आय.एफ. एस जर्मनी यांच्या यशस्वी यु.पी.एस.सी प्रवासावर लिहिलेले त्यांच्या पालकांचे पुस्तक मिशन- 'यूपीएससी' लेखक डॉ. सविता, डॉ. यशवंत चव्हाण यांच्या उपरोल्लेखित पुस्तकाचे विमोचनही याप्रसंगी करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, पालकांनी घेतलेले अपार कष्ट, त्याग व विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रमाचा सामाजिक विचार मंचावर दखल घेण्यासाठी व नवीन पिढीकरिता, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे स्पष्ट करून या कार्यक्रमास पालक तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे.
COMMENTS