*(महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून गुरूद्वारा येथे समारोप : समन्वयक कॉ.गंगाधर गायकवाड यांची माहिती)*
*नांदेड* - लखीमपूर खेरीयेथे भाजपच्या नेत्यांच्या गाड्यांखाली चिरडून ठार मारलेल्या पाच शेतकरी हुतात्म्यांच्या शहीद अस्थिकलश यात्रा १२ ऑक्टोबरपासून देशभर भाजपच्या केंद्र सरकारविरुद्ध प्रचार करत, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी व अटक याची मागणी करत, आणि ११ महिने पूर्ण केलेले ऐतिहासिक शेतकरी आंदोलन बळकट करण्याचे आवाहन करत फिरत आहेत.
त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातील शहीद कलश यात्रेचा उत्साही प्रारंभ २७ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी पुणे शहरातील महात्मा जोतीराव फुले यांच्या वाड्यापासून झाला. *‘शेतकऱ्याचा आसूड’ आणि ‘गुलामगिरी’* अशा विद्रोही पुस्तकांचे लेखक, शेतकऱ्यांचे कैवारी, जातिव्यवस्थेचे शत्रू आणि सावित्रीबाईंसह भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचे संस्थापक असलेल्या महात्मा जोतीराव फुले यांच्या वाड्यापासून या शेतकरी यात्रेची सुरुवात व्हावी हे सर्वार्थाने योग्यच होते.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि जनआंदोलनांची संघर्ष समिती या तीन मंचात असलेल्या सर्व घटक संघटनांतर्फे हा कार्यक्रम एकजुटीने आयोजित करण्यात आला आहे.
अनेक वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केलेल्या ऐतिहासिक फुले वाड्यात या सर्व संघटनांचे कार्यकर्ते जमा झाले. महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी, आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय नेत्या मेधा पाटकर यांनी पुष्पहार घालून या शहीद कलश यात्रेची सुरुवात झाली आहे. *दिनांक ८ नोव्हेंबर रोज सोमवारी शहीद कलश यात्रा सायंकाळी सहा वाजता नांदेड शहरात दाखल होणार असून महात्मा जोतीराव व माता सावित्री फुले यांच्या आयटीआय चौकातील पुतळ्यास अभिवादन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,महात्मा गांधी पुतळा या महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून जत्था चिखलवाडी कॉर्नर मार्गे गुरूद्वारा चौरस्ता येथे पोहचणार आहे आणि तेथेच शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मानवंदना देऊन व अभिवादन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.*
लखीमपूर खेरी येथील पाच शहीद आणि या शेतकरी आंदोलनातील आजवरचे एकूण *६३१* शहीद यांना सर्वप्रथम आदरांजली वाहण्यात येणार असल्याचे किसान आंदोलन समर्थन समितीचे समन्वयक कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शहीद कलश यात्रेचे स्वागत करण्यासाठी कॉ.ॲड.प्रदीप नागापूरकर, कॉ.विजय गाभणे,कॉ.बी.के.पांचाळ,कॉ.उज्वला पडलवार,कॉ.अरुण दगडू,कॉ.एम.आर.जाधव,कॉ.ना.रा.जाधव, कॉ.ॲड.व्यंकटराव करखेलीकर,डॉ.किरण चिद्रावार,सुर्कांत वाणी आदी किसान आंदोलन समर्थन समितीचे नेतृत्व करणार आहे.
राज्यभर फिरणारी शहीद कलश यात्रा दि.२७ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, चैत्य भूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, परळ येथील हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक आणि मंत्रालयाजवळ महात्मा गांधी यांचा पुतळा या सर्व स्थळांना वंदन करील.
आणि आझाद मैदान येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनी, रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी दुपारी आझाद मैदान येथे किसान - मजदूर महापंचायत भरेल. त्यात संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रित केले जाईल. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील *१०६* हुतात्म्यांचे स्मरण करणारा हुतात्मा चौक येथे शहीद कलश यात्रेचा समारोप होणार आहे.
COMMENTS