नांदेड.(विशेष प्रतिनिधी) तु आम्हाला पसंत नाहीस, असे म्हणत नवऱ्याच्या नोकरीकरिता तुझ्या माहेराहून पाच लाख रूपये घेवून ये, म्हणून एका ३० वर्षीय विवाहितेचा छळ करून जिवे मारण्याचीही धमकी दिल्याच्या आरोपावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह पाच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, 'कृष्ण' नगर, उदगीर (ता. उदगीर जि. लातूर) येथील रहिवासी अर्चना राहूल गायकवाड या विवाहितेच्या लग्नानंतर म्हणजे १३ मे २०२१ नंतर सासरकडील लोकांनी त्यांना केवळ १५ दिवस चांगले नांदविले आहे. तद्नंतर लहान-सहान कारणावरून आरोपी ननंद क्रांती दगडू गायकवाड तसेच पती राहूल गायकवाड यांनी, तु आम्हाला पसंत नाहीस. तुला घरकामासाठी आणले आहे, असे टोचून बोलू लागले. त्याचवेळी, सासरा दगडू गायकवाड यांनी आमचे घरात कामवाली पाहिजे होती, म्हणून आम्ही तुला लग्न करून आणलो आहोत, असे म्हणतच शिवीगाळ करून मारहाण करायचे. दरम्यान, आर्मीत असलेले आपले दिर प्रदीप गायकवाड आणि जावू वैशाली प्रदीप गायकवाड हे गावी आल्यानंतर आपल्या पतीचे कान भरतात. शिवाय, तिच्याकडून आपल्याला काही मुल-बाळ नको पाहिजे. 'ति'ला आपण केवळ घर कामासाठी वापरून सोडून द्यायचे आहे असे म्हणून सांगत असत, असा आरोप विवाहितेने दिलेल्या तक्रारीतच नमूद असल्याची माहिती ठाणे अंमलदार लक्ष्मण सूर्यवंशी व मदतनीस पो. कॉ. अश्विनी मस्के यांनी दिली.
एकूणच, सासरच्या उपरोल्लेखित पाच आरोपींनी आपल्याला १० जून ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत आपल्या सासरी तसेच माहेरी तु चांगली नाहीस. तु आम्हाला पसंत नाहीस, म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली आहे.
दरम्यान, उपाशीपोटी ठेवून शारीरिक तसेच मानसिक छळ केला व नवऱ्याच्या नोकरीकरिता पाच लाख रूपये माहेराहून घेवून आली नाही, तर तुला खतम करून टाकतो, असे म्हणून आपणास जिवे मारण्याची धमकी दिली आहे, असा आरोप विवाहिता अर्चना गायकवाड यांच्या तक्रारीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
याप्रकरणी अर्चना राहूल गायकवाड (रा. कृष्ण नगर, उदगीर जि. लातूर, ह. मु. जयभवानी नगर, सिडको, नांदेड) यांनी अखेर १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी नांदेड ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्याआधारे पतीसह उपरोक्त पाच आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर गव्हाणकर आणि त्यांचे अन्य सहकारी हेे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
COMMENTS