नांदेड.(प्रतिनिधी) अज्ञात चोरट्यांनी तब्बल १० लाख रूपये किंमतीचा अख्खा ट्रक चोरून नेला आहे. ही घटना ७ मे रोजी सकाळी आठवाजेचेदरम्यान, वाजेगाव ते बोंढार 'बायपास' रोडवर उघडकीस आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, 'नंदीग्राम' सोसायटी, नांदेड येथील रहिवासी तथा ट्रान्सपोर्टचे मालक सुखदेवसिंघ दलविरसिंघ बुटर यांच्या मालकीचा एमएच- २६, बीई-२४४८ या क्रमांकाचा ट्रक ६ मे रोजी न्यु श्रीराम पाटे मोपींग, बोंढार 'बायपास' रोड, (ता. जि. नांदेड) येथे लावण्यात आला होता. दरम्यान, सदरील ट्रकच्याजवळ कुणीही नसल्याची सुवर्णसंधी साधून अज्ञात चोरट्यांनी सहा मे रोजी रात्री १० ते सात मे रोजी सकाळी आठवाजेच्यादरम्यान, उपरोल्लेखित ठिकाणी लावलेला ट्रक चोरून नेला आहे, असा आरोप ट्रकमालक सुखदेवसिंघ बुटर यांनी दिलेल्या तक्रारीमध्येच नमूद असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार तथा सहाय्यक पोउपनि. डी. एन. मोरे व मदतनीस पो. कॉ. अश्विनी मस्के यांनी दिली.
याप्रकरणी उपरोल्लेखित ट्रक मालक सुखदेवसिंघ दलविरसिंघ बुटर (रा. नंदीग्राम सोसायटी, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीचेआधारे नांदेड 'ग्रामीण' पोलीस ठाण्यात अखेर २ जून रोजी रात्री उशिरा आरोपी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल परमेश्वर कदम व त्यांचे अन्य सहकारी पोलीस कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. बोंढार बायपास रोडवरील अख्खा ट्रकच चोरट्यांनी चोरून नेला असल्याने ट्रक मालक व ट्रकचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

COMMENTS