नांदेड. (प्रतिनिधी) नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 'सिडको' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी राबविण्यात आलेली नालेसफाईची मोहीम ही केवळ नावापुरतीच असून, अद्यापही या परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाल्या तुंबलेल्या आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड यांनी केला आहे.
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 'सिडको' वसाहतीतील क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने काही दिवसांपूर्वी नांदेडच्या 'सिडको' परिसरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यालगत असलेल्या काही नालेसफाई करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या 'सिडको' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी राबविण्यात आलेली नालेसफाईची मोहीम केवळ नावापुरती असून,अद्यापही सिडको वसाहतीतील नाईक महाविद्यालयाच्या 'जुन्या' इमारतीचेसमोरील मुख्य रस्त्याशेजारी असलेल्या नाल्या गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या आहेत. या परिसरातील नागरिकांनी 'मनपा'च्या क्षेत्रीय कार्यालयातील साफसफाई विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांकडे उपरोल्लेखित भागातील नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी केली. तद्नंतर या परिसरातील नाल्यांची थातुरमातुर साफसफाई करण्यात आली, परंतु येथील नाल्या पुन्हा तुंबलेल्या अवस्थेमध्ये असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे उपरोक्त नाल्यातील घाणपाणी व केरकचरा मुख्य रस्त्यावर येत असल्याने हजारो वाहनधारकांना व या परिसरातील व्यापारी-नागरिकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या साफसफाई विभागाकडून उपरोल्लेखित ठिकाणी तुंबलेल्या नाल्याची तत्काळ साफसफाई करून नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड यांनी दिला आहे.

COMMENTS