डिसेंबर २०२२ पर्यंत निरा नदीचे पाणी उजणी धरणात पोहचणार
ः दादासाहेब बन आष्टीः
- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांच्या अंतर्गत इंदापूर तालुक्यात सोनगांव व उद्धट येथे सुरु असलेल्या निरा - भिमा जोडप्रकल्पाच्या बोगदा काम व निरा नदीवरील बॅरेज काम सुरू आहे. २४ किलोमीटर लांबीचा बोगदा पाडून निरा नदीचे पाणी भिमा नदीवरील ऊजणी धरणात टाकुन ते पुढे आष्टी तालुक्यातील खुंटेफळ धरणात सोडले जाणार आहे. बोगद्याचे ६५ टक्के काम पुर्ण झाले असुन हि योजना डिसेंबर २०२२ पर्यंत उजणी धरणापर्यंत कार्यान्वीत होणार असल्याचे अधिकार्यांनी सांगीतले.
मराठवाडा हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहे. चांगला पाऊस झाला तरी डिसेंबर जानेवारी पर्यंत पाणी परिस्थिती चांगली राहते नंतरचे चार पाच महिने सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. खात्रीशीर पाणी नसल्याने शेती व्यावसाय देखील बेभरवशाचा बनला आहे. कुकडीचे पाणी सिना धरणातुन मेहेकरीत टाकण्याच्या योजनेच्या कामाची सुरुवात आणि प्रत्यक्ष पाणी योजना पुर्ण करुन मेहेकरीत पाणी टाकण्याचे काम माजी आमदार भिमराव धोंडे विधानसभा सदस्य असताना झाले आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजाताई मुंडे व इतर अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. आष्टी मतदारसंघाचा दुष्काळ कायमचा हटावा आणि हा भाग पश्चिम महाराष्ट्रासारखा सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी माजी आमदार भिमराव धोंडे सतत प्रयत्नशील असतात. कृष्णा मराठवाडा प्रकल्प या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्याला निरा भिमा जोडप्रकल्पाचे पाणी मिळणार आहे. या कामाबाबत सहायक अभियंता राहुल घनवट यांनी सांगितले की, सुमारे २४ किलो मिटर लांबीच्या बोगद्याचे काम इंदापूर तालुक्यात रात्रंदिवस सुरू आहे. पैकी १४.५ किलोमीटरचे काम पुर्ण झाले आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पुर्ण होणार आहे. हा बोगदा डी आकाराचा असुन एकुण आठ शाफ्टवर बोगद्याचे काम सुरू आहे. शाफ्ट पासुन दोन्ही बाजुला सुमारे १३०० फुट काम एकाचवेळी सुरू आहे. सुमारे १२५ फुट खोलीवर हा बोगदा आहे. ५ मीटर बोगदा पाण्याने भरुन वाहणार आहे. २००९ च्या टेंडर नुसार सुरुवातीला ४३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु निधी अभावी काम लांबणीवर पडले आणि या कामाचे बजेट ७५० कोटींवर गेले आहे.
पावसाळ्यात निरा नदीचे ६० दिवस पाणी निरा - भिमा जोडप्रकल्पाच्या सात टीएमसी पाणी बोगद्यातून उजनी धरणात सोडले जाईल. तेथुन उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून लेन क्रमांक ३ मार्फत खुंटेफळ साठवण धरणात सोडले जाईल.
आष्टी तालुक्यातील २७ हजार हेक्टर क्षेत्र या योजनेमुळे ओलीताखाली येईल असेही सहायक अभियंता राहुल घनवट यांनी सांगितले. नंदेश कर्डीले सहायक अभियंता श्रेणी १ यांच्या मार्गदर्शनाखाली
इंदापूर तालुक्यातील उद्धट येथील निरा नदीवर उद्धट बॅरेजचे काम सुरू आहे. अंदाजे ८० कोटी रुपये खर्चुन हे काम पुर्ण होणार आहे. निरा नदी अडवुन पावसाळ्यात ६० टक्के पाणी बोगद्यात सोडण्यात येणार आहे. निरा - भिमा जोडप्रकल्पाच्या बोगद्यातून उजनी धरणात सोडले जाईल. तेथुन उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून लेन क्रमांक ३ मार्फत खुंटेफळ साठवण तलावात येणार आहे. बॅरेज व बोगदा हे दोन्ही कामे जोरात सुरू आहेत. यावेळी माजी आमदार भिमराव धोंडे यांनी सांगितले की,आष्टी हा भाग कायमस्वरूपी दुष्काळी आहे.आम्ही कृष्णा खोऱ्यात आहोत. हे पाणी मिळणे आमचा हक्क आहे. शासनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन आम्हाला पाणी द्यावे व आमचा दुष्काळ कायमचा हटवावा असेही माजी आमदार भिमराव धोंडे यांनी सांगितले. यावेळी बारामती येथील समता पतसंस्थे चेअरमन दिलीपदादा फरांदे, रोहीत घनवट, धनंजय हिवरकर, अक्रुरसेठ कुदळे पाटील, बाळासाहेब भुकन व इतर उपस्थित होते.
आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आ. भीमराव धोंडे आणि पत्रकारांनी या कामाला भेट दिली. यावेळी १२५ फुट खोल बोगद्यात उतरुन माजी आ. भीमराव धोंडे यांच्याकडून निरा - भिमा जोडप्रकल्पाच्या बोगदा कामाची पाहणी केली.
२७ हजार हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली
निराश नदीतून अतिरिक्त जाणार्या पाण्यापैकी सात टीएमसी पाणी निरा नदीतून बोगद्याद्वारे भिमा नदीवरील ऊजणी धरणात सोडले जाणार आहे. व ऊजणीतुन पाईपलाईन व्दारे आष्टी तालुक्यात ते पाणी येणार असुन आष्टी तालुक्यातील २७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

COMMENTS