(मॅनेजर च्या उंटावरून शेळ्या)
केज दि. १७ - मांजरसूंबा ते अंबाजोगाई दरम्यान सुरू असलेल्या राज्य रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने होत आहे. केज शहरातून जाणारा रस्ता वर्दळीच्या ठिकाणी विनाकारण खोदून ठेवत मागच्या एक महिन्यापासून काम बंद केले आहे. रस्त्यांवर अपघात होऊन कित्येकांचे अपघात होत आहेत. सदरील काम येत्या दोन दिवसांत सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राहुल खोडसे यांनी केली असून मॅनेजर च्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिला आहे.
राज्य रस्ते बांधणी अंतर्गत जिल्ह्यातील मांजरसुंबा ते अंबाजोगाई रस्त्याचे काम एचपीएम कंपनीकडे आहे. सुरुवातीला दोन्ही बाजूनी रस्ता खोदून ठेवल्याने वाहनधारक त्रस्त झाले होते. यामध्ये कुठल्याच बाजूने वाहने चालवणे शक्य नव्हते.त्यामुळे अनेक अपघात होऊन केवळ मानवी चुकांमुळे अनेकांना जायबंदी होण्याची वेळ आली. अतिशय संथ गतीने होणारे काम आणि नियोजनाच्या अभावामुळे तीन वर्षे झाली तरी रस्ता पूर्ण झालेला नाही. तर जो काही रस्ता पूर्ण झाला आहे त्यामध्ये जागोजागी काम अर्धवट ठेवल्याने अचानक गाड्या आदळून अपघात झालेले आहेत. तसेच जो रस्ता खोदून ठेवला आहे त्यावर कसल्याच प्रकारचे पाणी मारले जात नसल्याने धुळीचे लोटच्या लोट उडत आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसून धूळ मोठ्या प्रमाणावर डोळ्यात जात असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
मागच्या कांही दिवसांपूर्वी केज शहरात काम सुरू केले होते. मात्र एक महिन्यापासून काम बंद केले आहे. सदरील कंपनीने कामावर देखरेख करण्यासाठी कायमस्वरूपी श्री.शिंदे मॅनेजर ची नेमणूक केलेली असताना सदरील मॅनेजर केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत असल्याने त्यांचे कामावर व कामगारांवर कसल्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही.
दरम्यान केज शहरांतर्गत राहिलेले अर्धवट काम येत्या दोन दिवसांत सुरू करून तात्काळ पूर्ण करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड केजच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा ब्रिगेड स्टाईलने मॅनेजर च्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS