मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून देशातील लाखो शेतकरी थंडी, ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता दिल्लीच्या सीमेवर सरकार विरोधी आक्रोश करीत आहेत, देशातील कष्टकऱ्यांच्या हितासाठी अन्नदात्याने आपले सर्वस्व पणाला लावले आहे, मात्र भांडवलधार्जीण्या सरकारला जाग येत नाही म्हणूनच शेतकऱ्यांनी हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन हजारो शेतकरी मुंबईत आझाद मैदानावर जमले आहेत.
हिंद मजदूर सभा, महाराष्ट्र कौंसिलच्यावतीने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा व कामगार कायद्यातील बदलाला विरोध करण्यासाठी 25 जानेवारीला दुपारी 12 वाजता शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत कर्नाक बंदर येथून मोर्चा निघून आझाद मैदानावर गेला. या मोर्चात मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ऍड. एस. के. शेट्ये, महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, खजिनदार निवृत्ती धुमाळ, नुसीचे असिस्टंट सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्सचे सेक्रेटरी राजाराम शिंदे, एमयूआयचे नेते पगार, टाकसाळ मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी मुकुंद वाजे, मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या त्रिशिला कांबळे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव, पदाधिकारी निसार युनूस, पुंडलीक तारी, कार्यकर्ते रमेश कुऱ्हाडे, नरेंद्र वाडीकर आदी कामगार नेते, कार्यकर्ते, कामगार सहभागी झाले होते.
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS