सोनपेठ/प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपासून शहराबाहेर सुरू असलेला आठवडी बाजार पूर्वीच्याच जागेत सुरू करावा अशी मागणी शहरातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने नगर परिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड यांच्याकडे रविवारी केली आहे.
शासनाच्या निर्णयाप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार काही दिवस बंद होता.परंतु लॉकडाऊन शिथिलच्या टप्प्यात सर्व व्यवहार पूर्ववत हळूहळू सुरू झाले आहेत.शहरात सोमवारी भरणारा आठवडी बाजारही पूर्वपदावर आला असल्याने भरत असलेल्या सध्याच्या बाजारासाठी रिंग रोड दूर होत असून ग्रामीण भागातून बाजारास खरेदी करण्यास येणाऱ्या वाहनाचे थांबे पूर्वी असणाऱ्या आठवडी बाजाराच्या जवळ आहेत.शहराबाहेरील रिंग रोडवर भरत असलेला बाजार हा महिलांसाठी दूर होत असून एक कि.मी.पायी चालत बाजाराचे ओझे आणणे शक्य होत नसल्यामुळे व रिंग रोडवर दोन्ही बाजूने भरणाऱ्या बाजारामुळे महिला अबालवृद्धांना बाजार करण्यासाठी अपुरी जागा होत असल्याने बाजार शहरातील जुनी नगरपालिका परिसरात पूर्वीच्याच जागेत सुरू करावा अशी मागणी रविवारी एका शिष्टमंडळाने केली.सर्वदूर परिचित असलेला सोनपेठचा आठवडी बाजार मागील दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर भरत आहे,मागील अनेक वर्षापासून येथील आठवडी बाजार प्रसिद्ध असून यासाठी माजलगाव,वडवणी,परळी,पाथरी,मानवत,पालम,आंबेजोगाई,धारूर,गंगाखेड या तालुक्यातील व्यापारी आठवडी बाजारमध्ये भाजीपाला व कपडा,मसाले आदी सामान विक्री करण्यासाठी घेऊन येत असतात.यामुळे सर्वदूर परिचित असलेला हा बाजार शहराबाहेर सुरू असल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास अडचणीचा ठरत आहे.सोमवारच्या बाजारावरच आठवड्याची मोठी आर्थिक उलाढाल होत असते,यावरच आर्थिक देवाण-घेवाण होत असते,परंतु सध्या शहराबाहेर बाजार सुरू असल्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.पूर्वीच्याच जागेवर बाजार सुरू करून बाजाराच्या जागेची व्याप्ती वाढवुन पोलिस वसाहत परिसर व जुने पोलिस स्थानकापर्यंत व्यापाऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी बसण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ज्येष्ठ व्यापारी आश्रोबा खरात,केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे शहराध्यक्ष सुरेशकुमार लोढा,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा कुसुमकर,गुलाबनबी सौदागर,डॉ.गणेश मुंडे,दशरथ कुसुमकर,मुस्ताक बागवान,मोहम्मद बागवान,रवींद्र शेटे आदी नागरिकांनी केली आहे.
*व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही:-चंद्रकांत राठोड*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराबाहेर सुरू असलेला आठवडी बाजार जुन्या ठिकाणी सुरू करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.शहराबाहेर बाजार सुरू असल्यामुळे व्यापाऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान व महिला,अबालवृद्धांना होणारा ञास लक्षात घेता नागरिकांच्या मागणीचा विचार करून लवकरच योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे मात्र सेलू,मानवत,पाथरी आदी नगरपालिकेच्या हद्दीतील बाजारही स्थलांतरित झालेले आहेत.संबंधितांशी चर्चा करून शासनाच्या येणाऱ्या सूचना लक्षात घेऊन पुढील पावले उचलण्यात येतील व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी नगरपालिका आग्रही भूमिका घेईल अशी प्रतिक्रिया नगर परिषदेचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी दिली आहे.


COMMENTS