प्रतिनिधी (दि. २४ डिसेंबर) देशातील कामगारांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक सक्षमता, कौटुंबिक प्रतिष्ठा आणि त्यांच्या श्रमाचा सन्मान ठेऊन त्यांना योग्य मोबदला देण्याचे काम आतापर्यंत कॉंग्रेस पक्ष करीत आला आहे. प्रचलित कामगार कायद्यातून कॉंग्रेसने कामगारांना संरक्षण दिले होते. तर केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकारने कामगारांना वा-यावर सोडले आहे. असे प्रतिपादन असंघटीत कामगार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बद्रुजम्मा साहेब यांनी चिंचवड येथे केले.
गुरुवारी चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सुंदर कांबळे, महाराष्ट्र अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक शिवाजीराव जगताप, असंघटीत कामगार कॉंग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल शिंदे, महिला शहराध्यक्षा शितल कोतवाल, असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, पुणे जिल्हा असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, कामगार नेते सिताराम चव्हाण तसेच संदेश नवले आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील २७ कंपन्यांतील प्रतिनिधींनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि निवड झालेल्या ४५० हून जास्त उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच शितल कोतवाल यांना घरेलू महिला कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश समन्वयकपदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले.
बद्रुजम्मा म्हणाले की, स्वातंत्र्यपुर्व काळापासून देशात कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला, सुरक्षा देण्यासाठी कामगार कायदे अस्तित्वात होते. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसने चांगले बदल करीत कामगारांना अधिक सुरक्षा देणारे कायदे करुन कामाचे २४० दिवस भरल्यावर त्या कामगाराला कायम कामगार म्हणून घेतले जायचे. कारखाना बंद करताना १०० पेक्षा जास्त कामगार असतील तर सरकारची परवानगी लागत होती. यासर्व कायद्यात बदल करुन केंद्र सरकारने त्यांना भांडवलदार, उद्योगपती मित्रांना फायदा आणि सर्व कामगारांचे जीवनभर नुकसान करणारे कायदे केले. येथून पुढे कोणताही कामगार परमनंट होणार नाही. पगाराची शाश्वती नाही. वेळी अवेळी कामाचे तास वाढवले जातील. पगार वेळेवर मिळणार नाही. कोट्यावधी कामगारांच्या कुटूंबाचे जीवन अस्थिर होणार आहे. याला मोदी सरकार जबाबदार आहे. मागील सहा वर्षात या भाजपा सरकारचे चुकीच्या पध्दतीने जीएसटी कायदा आणला. अचानकपणे नोटाबंदी केली यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था अडचणीत आली. देशभर बेरोजगारी वाढली. कोरोनामुळे १४ कोटी लोकांचे रोजगार गेले. या सरकारने काही केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव वाढवले. आम्ही असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बेरोजगार झालेल्या कामगारांना मदत करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत महाविकास आघाडी सरकारने बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये रोख आर्थिक मदत केली. याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आभारी आहे. आता घरेलू काम करणा-या महिलांना देखील कोरोना काळातील दिवसांचा विचार करुन आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. याला देखिल लवकरच यश येईल असा विश्वास बद्रुजम्मा यांनी व्यक्त केला.
देशातील बहुजन समाजाला, कामगार, शेतक-यांना गुलाम करायचं आणि भांडवलदारांचं भलं करायचं हा बीजेपीचा छुपा झेंडा आहे. देशाच्या आर्थिक भरभराटीमध्ये कामगारांचे योगदान महत्वाचे आहे. कामगारांना आणि शेतक-यांना सन्मानाने जगायचे असेल तर भाजपला सत्तेतून घालविले पाहिजे अशी टिका महाराष्ट्र अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक शिवाजीराव जगताप यांनी केली. असंघटीत कामगार कॉंग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल शिंदे म्हणाले की, पिंपरी चिंचवड मधील ५५०० पैकी ४००० उद्योग आजारी, बंद किंवा राज्यातून स्थलांतरीत झाले आहेत. महाराष्ट्र उद्योग व्यवसायात प्रथम क्रमांकावरुन तीस-या क्रमांकावर गेला आहे. याला केंद्राचे उद्योग धोरण जबाबदार आहे. प्रास्ताविक करताना सुंदर कांबळे म्हणाले की, लॉकडाऊनचा मोठा फटका पिंपरी चिंचवड या कामगार नगरीला बसला आहे. महानगरपालिकेने या काळात कामगारांना कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे लाखों कामगार आपल्या मुळ गावी गेले. शहरातील उद्योग चक्र पुन्हा वेगाने सुरु होण्यासाठी आता असंघटीत कामगार कॉंग्रेस लढा उभारणार आहे. लॉकडाऊन काळात सलग दोन महिने पिंपरीत असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने अन्नदान करण्यात आले अशी माहिती सुंदर कांबळे यांनी दिली. सोशल मीडिया समन्वयक मोहन उनवणे, हातगाडी, टपरी, पथारी, समन्वयक अझहर पुणेकर, रिक्षा संघटनेचे समन्वयक दिलीप साळवे, लघुउद्योग समन्वयक विजू शिंदे, ड्रायव्हर संघटनेचे समन्वयक नवनाथ डेंगळे, माथाडी कामगार समन्वयक नितीन पटेकर, असंघटित कामगार कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर सचिव अतुल जाधव, भोसरी विधानसभा अध्यक्ष हातगाडी, टपरी, पथारी चांद बागवान, फातिमा शेख, अनिता रंधवे, वंदना आराख, हिना बागवान व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनात सहभाग घेतला.
स्वागत शितल कोतवाल, प्रास्ताविक सुंदर कांबळे, सुत्रसंचालन प्रा. किशोर मनवर आणि आभार अझहर पुणेकर यांनी मानले.
--------------------------------------------
addComments
टिप्पणी पोस्ट करा