ऑनलाईन च्या जमान्यात पोस्टाचा गलथान कारभार दोन महिने झाले तरी नायगावहून पाठवलेली मनिऑर्डर अहमदपूरला पोहचेना


दोन महिने झाले तरी नायगावहून पाठवलेली मनिऑर्डर अहमदपूरला पोहचेना 

नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

ऑनलाईनच्या जमान्यात कुठलीही गोष्ट चुटकसरशी होत असताना नायगावच्या पोस्ट ऑफिसमधून तब्बल दोन महिन्यापूर्वी पाठवलेली अवघ्या पाचशे रूपयाची मनिऑर्डर अवघ्या शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावरील अहमदपूरला अद्यापही पोहचली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सबंध देशभरातील पोस्ट ऑफिस ऑनलाईनने जोडले असतांना एका जिल्ह्यातून पाठवलेली मनिऑर्डर अगदी शेजारी खेटून असलेल्या जिल्ह्यातील तालुक्याच्या गावात मनिऑर्डर पोहचली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, नायगांव येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा पत्रकार प्रदीप धोंडिबा पाटील यांनी दि. २८ ऑक्टोबर २०२० रोजी अहमदपूर जि. लातूर येथील 'अक्षर माड्.मय ' या त्रैमासिकाचे संपादक डाॅ. नानासाहेब सूर्यवंशी यांच्याकडे पाचशे रूपयाची वार्षिक वर्गणी पाठवली होती. केंद्र शासनाकडून चालवण्यात येत असलेल्या पोस्ट ऑफिसचा कारभार हा ऑनलाईनला जोडला असल्यामुळे नायगावच्या ऑफिसहून पाठवलेकी लगेच दुस-या क्षणी अहमदपूरच्या ऑफिसला जाणे अपेक्षित असताना मनिऑर्डर पाठवून तब्बल दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापही नायगावहून पाठवलेली मनिऑर्डर अहमदपूरला अजून पोहचली नाही. दोन्ही कार्यालयात अनेक वेळा चौकशी करूनही इकडून पाठवलेली मनिऑर्डर तिकडे पोहचली नसल्याने प्रदीप धोंडिबा पाटील यांनी दि. ९ डिसेंबर रोजी याबाबत नायगावच्या ऑफिस मध्ये रितसर तक्रार नोंदवली. त्याला सुद्धा वीस दिवसापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी केलेल्या तक्रारी संदर्भात नायगांव व नांदेड येथील मुख्य कार्यालयाने कसलीच हालचाल केली नाही. परिणामी तब्बल दोन महिन्यापूर्वी पाठवलेली अवघ्या पाचशे रूपयाची मनिऑर्डर अवघ्या शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावरील अहमदपूरला अद्यापही पोहचली नाही.

इंटरनेट सुविधेमुळे अख्खे जग एका जागी जोडले गेल्याने संदेश पाठवणे, संवाद साधणे, पैसे पाठवणे अशा गोष्टी चुटकसरशी उरकत आहेत. मात्र पोस्ट ऑफिस मात्र याला अपवाद ठरल्याचे समोर आले आहे. 

इतर कार्यालया सारखे देशातील पोस्ट ऑफिस सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाने जोडले आहे. परंतु श्री पाटील यांनी नायगांव येथून पाठवलेली मनिऑर्डर तब्बल दोन महिन्या नंतरही अगदी नांदेड जिल्ह्याला खेटून असलेल्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर सारख्या तालुक्याच्या गावी पोहचत नाही म्हंटल्यावर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे. 

नायगांव व नांदेड येथील मुख्य कार्यालयाने या प्रकरणात लक्ष घालून मनिऑर्डर नेमकी कुठे अडकली याचा शोध घेऊन पाठवलेल्या ठिकाणी पोहचती करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रदीप धोंडिबा पाटील यांनी केली आहे.

टिप्पण्या