महेंद्र पुरी जिल्हा प्रतिनिधी
हिंगोली जिल्हयात मागील काही महिन्यांपासून अवैध वाळू वाहतुक जोरात सुरू असुन हिंगोली तालुक्यातील दुर्ग धामणी शिवरा मध्ये असलेल्या गायरान जमिनीवर अज्ञात आरोपींनी वाळू साठा करून ठेवल्याची गुप्त माहिती हिंगोली चे तहसिलदार पांडूरंग माचेवाड यांना मिळाल्यानंतर हिंगोली चे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार यांच्या पथकाने कारवाई करीत 50 लाख रुपयांचा रेती साठा जप्त केला.
हिंगोली तालुक्यातील दुर्ग धामणी शिवराम मध्ये गायरान जमिनीवर अज्ञात आरोपींनी मोठ्या प्रमाणात रेती साठा जमा करुन ठेवल्याची माहिती हिंगोली तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह आज मंगळवारी पहाटे घटनास्थळी धाव घेऊन सदर रेती साठा जप्त केला. यानंतर वाहनाद्वारे सदर साठा हिंगोली तहसील कार्यालय परिसरात आणण्यात आला असून यासंदर्भात पुढील कारवाई सुरू आहे.
दरम्यान हा रेती साठा जवळपास 400 ब्रास असून याची किंमत साधारणपणे पन्नास लाख रुपयांच्या घरात असल्याची माहिती दिली आहे. पांडूरंग माचेवाड यांनी हिंगोली तहसिलदार पदाचा पदभार घेतल्यानंतर केलेल्या धडाकेबाज कारवाई ने हिंगोली जिल्ह्यातील वाळु माफियाचे धाबे दणाणले आहेत.
*अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करणार- अतुल चोरमारे*
हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू माफिया सक्रीय झाले असुन जिल्ह्यात रात्री बे रात्री अवैध वाळू वाहतुक जोरात सुरू आहे. या अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी अवैध वाळू वाहतुकी विरूद्ध धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती हिंगोली चे कर्तव्य दक्ष उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी ग्लोबल मराठवाडाशी बोलतांना दिली आहे.


COMMENTS