केज प्रतिनिधी.
परतीच्या मॉन्सूनसाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत काही अंशी ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत आणि संपूर्ण विदर्भात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
गेले काही दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. उत्तर अंदमान आणि बंगालचा उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे रविवारपासून (ता. ११) कोकण वगळता राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात चढउतार सुरू झाले आहेत.
सोलापूर येथे ३५.४ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्यातही कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत २.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली. महाबळेश्वर येथे १६.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. पावसामुळे विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे.
उद्या संततधारेची शक्यता..
उद्या (ता.१०) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत हलका ते जोरदार पाऊस पडेल. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात वेगाने बदल होत असून पावसासाठी वातावरण बनत आहे.
COMMENTS