धर्माबाद (अहमद लड्डा)
नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे धर्माबाद चे उद्योगपती सुबोध काकाणी यांनी काकाणी परिवाराच्या वतीने जनसेवेसाठी सर्वसुविधा युक्त कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध केली असून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.
यापूर्वी उद्योजक सुबोध काकाणी यांनी जनतेच्या आरोग्यासाठी सेवा म्हणून स्वतः ची एक व बुलढाणा अर्बन पतसंस्था कडुन एक अशा दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या.नव्याने आज तिसरी रुग्णवाहिका त्यांनी दिली असून ही रुग्णवाहिका अत्याधुनिक व सर्वसुविधा युक्त कार्डियाक आहे.
जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या हस्ते धर्माबाद चे उद्योजक सुबोध काकाणी यांनी जनसेवेसाठी आणलेल्या सर्वसुविधा युक्त कार्डियाक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नांदेड येथे संपन्न झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,धर्माबाद चे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, व काकाणी परिवारातील सदस्य म्हणून डॉ.सौ. शोभा अनिल तोष्णीवाल, डॉ. भरत तोष्णीवाल, सौ.कांतादेवी सारडा ,तसेच धर्माबाद पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सतिष पाटील शिंदे,संपादक मनोज बुंदेले,मन्मथ अपा स्वामी आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
ही रुग्णवाहिका जनसेवेसाठी असून ना नफा ना तोटा या धर्तीवर फक्त सेवा म्हणून कार्यन्वित राहील. धर्माबाद ते नांदेड हे अंतर अतिशय लांब आहे आणि अतिगंभीर रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत भविष्यात अशा घटना घडू नये व वेळेच्या आत गरजूंना उपचार व सुविधा मिळाव्यात म्हणून काकाणी परिवाराच्या वतीने ही सुविधा अखंडपणे सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्योजक सुबोध काकाणी यांनी दिली.
COMMENTS