केज प्रतिनिधी. -
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे काम केलेल्या पंकजा मुंडे यांना थेट राष्ट्रीय स्तरावर स्थान दिल्याने पंकजा मुंडे यांचे कर्तृत्व सिद्ध झाल्याचे मत युवा नेते विष्णू घुले यांनी व्यक्त केले.
भाजपच्या जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदी विराजमान केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल केज तालुक्यात भाजपचे युवानेते तथा मुंडे कुटुंबाचे निकटवर्तीय विष्णू घुले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान पंकजा मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर राज्य स्तरावर कॅबिनेट मंत्री म्हणून विविध खात्याचा कार्यभार सांभाळत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केलेले आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक भागात त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक आमदार खासदार निवडून आणण्याचे काम सुद्धा त्यांनी केलेले आहे. महिला व बालकल्याण खाते त्यांच्याकडे असताना त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले असून ग्रामविकास मंत्री असताना जिल्ह्यासाठी भरीव निधी देऊन जिल्ह्याचा विकास करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी सोडवण्याला प्राधान्य देत त्यांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले असून आता त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याने तिथे सुद्धा त्या आपल्या कार्यशैलीमुळे नक्कीच छाप पाडतील असा विश्वास विष्णू घुले यांनी व्यक्त केला.
COMMENTS