आरोग्य क्षेत्रातील असंघटीत कामगारांना शासनाने विमा कवच द्यावे-चंदुलाल बियाणी


लाखो कर्मचार्‍यांची अ‍ॅन्टीजेन्ट टेस्ट विनामूल्य करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


परळी (प्रतिनिधी-)


महाराष्ट्रात सुमारे 1 लाख पेक्षा अधिक खाजगी रुग्णालय असून या सर्व ठिकाणी एकत्रीत असे असंघटीत कामगार वॉर्ड बॉय, नर्स, वॉचमन, लॅब टेक्नीशियन, रुग्णालयातील कर्मचारी तसेच औषधी दुकानातील कर्मचारी, रक्तपेढी विभागातील कर्मचारी, डॉक्टरांचे ड्रायव्हर, डॉक्टरांच्या घरी घरकाम करणारे कर्मचारी, वॉचमन ही सर्व मंडळी कर्मचारी म्हणून 24 तास सेवा देतात.असे लाखो कर्मचारी काम करीत असतात. राज्यात सर्वच ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वाढल्याने या सर्वांच्या व त्यांच्या कुटूंबीयांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभुमीवर कोव्हीड-19 संबंधीत खाजगी रुग्णालयात कार्यरत असणार्‍या, आरोग्य सेवा देणार्‍या सर्व संबंधीतांना विमा कवच द्यावे, अशी मागणी परळी आरोग्य मित्रचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य, न.प. सदस्य चंदुलाल बियाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


प्रस्तुत निवेदनाच्या माध्यमातून चंदुलाल बियाणी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासमोर आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांचा गंभीर व तेवढाच महत्वाचा विषय समोर ठेवला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की,राज्यात लाखो रुग्णालयात असे मोठ्या संख्येने कर्मचारी म्हणून 24 तास सेवा देतात. या सर्व कामगारांची कोठेही अधिकृत शासनाकडे नोंदणी नसल्याने व हे सर्व असंघटीत असल्याने कोव्हीड-19 संबंधीत असलेल्या विमा कवचापासून दूर आहेत. या कर्मचार्‍यांना संसर्गाची बाधा झाल्यास, मृत्यू ओढावल्यास पुढे काय? हा प्रश्न असून या असंघटीत कामगारांना शासनाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे बियाणी यांनी निवेदनात नमुद केले आहे. पुढे म्हटले आहे की, राज्यातील खाजगी रुग्णालयात काम करणार्‍या व आरोग्य सेवा देणार्‍या सर्व क्षेत्रातील असंघटीत कर्मचार्‍यांना महाराष्ट्र राज्य सरकारने विमा कवच देणे गरजेचे आहे. सध्याची कोरोना संकट पाहता ही सर्व मंडळी जिव धोक्यात घालून काम करीत आहेत. कृपया आपण वैयक्तीक लक्ष घालून या सर्व असंघटीत कामगारांना विमा कवच मिळवून द्यावे, तसेच या सर्वांची अ‍ॅन्टीजेन्ट टेस्ट विनामूल्य करुन घ्यावी असे आवाहन चंदुलाल बियाणी यांनी या निवेदनात केले आहे. राज्यातील मोठ्या संख्येने कोरोना आरोग्य सेवा देणार्‍या लाखो कर्मचार्‍यांच्या जिवनाचा प्रश्न विमा कवच मिळाल्याने सुटणार असून त्यामुळे रुग्णसेवेत काम करतांना कर्मचार्‍यांना मदत होणार आहे असेही निवेदनात त्यांनी म्हटले आहे.


टिप्पण्या