मुंबई, १६ जुलै २०२०
*राज्यातील कोरोनाची स्थिती भयानक; मुख्यमंत्र्यांना स्थिती हाताळण्यात अपयश*
*भाजपा खा. नारायण राणे यांची टीका*
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असल्याने त्यांचे प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी राज्यातील कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे, असे प्रतिपादन भाजपा खा. नारायण राणे यांनी गुरुवारी केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खा. राणे म्हणाले की, कोरोनाची स्थिती हाताळताना कोणाचाच पायपोस कोणाला नाही, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडतच नसल्याने त्यांना राज्यातील नेमकी स्थिती काय आहे, हे कळतच नाहीये. प्रशासनावर राज्यकर्त्यांचा वचक राहिलेला नसल्याने स्थिती भयानक बनली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत, सर्वाधिक मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. मात्र या राज्यातील रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. मुख्यमंत्री घरात बसले आहेत, मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यभर हिंडून परिस्थितीची पाहणी करत आहेत. आरोग्य सेवकांना, पोलिसांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत, रुग्णांच्या समस्या जाणून घेत आहेत.
यावेळी खा. राणे यांनी शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखतीबद्दलही भाष्य केले. कोरोनामुळे राज्यातील गंभीर बनलेल्या स्थितीबाबत पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे मार्गदर्शन घेण्याऐवजी भूतकाळातील राजकीय घडामोडींबाबत मुलाखत घेऊन मुलाखतकारांनी आपल्याला राज्यातील स्थितीचे भान नाही हेच दाखवून दिले आहे. राज्यातील गंभीर स्थितीवरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ही मुलाखत घेतली असावी, असेही खा. राणे म्हणाले. यावेळी त्यांनी सामना मधून शरद पवार यांच्यावर झालेल्या टीकेचे दाखलेही दिले. ज्या पवारांवर एवढी टीका केली त्याच पवारांची मॅरेथॉन मुलाखत सामनाला प्रसिद्ध करावी लागते आहे, यातच सारे आले, असे खा.राणे यांनी नमूद केले.
कोकणात चक्रीवादळ होऊन महिना उलटला तरी वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नसल्याबद्दल खा. राणे यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षणाबाबत शासनाची बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चांगले वकील नेमण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी नगरसेवक अतुल शाहा उपस्थित होते.
_______________________________________
मुंबई, १६ जुलै २०२०
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे*
*रझा अकादमीची पाठराखण करतात का?*
*भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल*
मुंबईत आझाद मैदानात हैदोस घालून महिला पोलिसांवर हल्ले करणाऱ्या रझा अकादमीने एका चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्या मागणीचे समर्थन करत केंद्र सरकारकडे लेखी शिफारस केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या गृहमंत्र्यांप्रमाणेच रझा अकादमीची पाठराखण करतात का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केला.
मा. केशव उपाध्ये म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयातभर अल्पसंख्यांकांच्या अनुनयाला कडवा विरोध केला. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा शब्द त्यांना दिला होता म्हणून आपण काँग्रेस - राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला असे सांगून जनादेशाचा अपमान करीत अपवित्र आघाडी करणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना स्वर्गीय बाळासाहेबांच्या भूमिकेचे विस्मरण झाले आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
ते म्हणाले की, रझा अकादमीच्या मोर्च्याने मुंबईतील घडलेला हिंसाचार, पोलिसांवरील अत्याचाराच्या आठवणी अद्यापही ताज्या असताना त्याच अकादमीने द मेसेंजर या चित्रपटावर बंदीची मागणी केल्यानंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली. त्यांनी या मागणीला पाठिंबा देत केंद्र सरकारकडे बंदीची मागणी केली. या चित्रपटामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावतील असे सांगत रझा अकादमीने चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. मात्र इराण मधील दिग्दर्शक माजिद माजदी यांनी २०१५ मध्ये बनवलेल्या या चित्रपटावर इस्लामी देश असलेल्या इराणमध्येही बंदीची मागणी केली गेलेली नाही. धर्मनिरपेक्ष भारतात विशिष्ट धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील असे म्हणत बंदी घालावी, अशी मागणी होते आणि राज्याचे गृहमंत्री लगेच तशी मागणी करतात यातून सत्तारूढ आघाडीला विशिष्ट धर्मियांचे लांगुलचालन करायचे आहे, हे स्पष्ट होते.
रझा अकॅडमीच्या पत्राची तत्परतेने दखल घेणाऱ्या सरकारचे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाच्या आषाढी यात्रेकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले होते. मानाच्या वारीसाठी हेलिकॉप्टरची देण्याची घोषणा करणाऱ्या व प्रत्यक्षात एसटीचे भाडेही वारकऱ्यांकडून वसूल करणाऱ्या या सरकारला मात्र त्यावेळी वारकऱ्यांसाठी काही करायची इच्छा नव्हती, असेही उपाध्ये पुढे म्हणाले.
COMMENTS