गेल्यावर्षी 1008 झाडें लावून त्याचे आज झाले झाले घन वन
मोरया प्रतिष्ठान च्या माद्यमातून उपजिल्हा रुग्णालय झाले नंदनवन
सेलू ( किशोर कटारे ) मागील वर्षी मोरया प्रतिष्ठान परिवार सेलू च्या वतीने दि.३० जून २०१९ रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने लोकसहभागातून विविध स्वदेशी १००८ झाडांचे घन वन पद्धतीने वृक्षारोपण केले होते त्याचे योग्य नियोजन करत लावलेल्या रोपांचे संवर्धन करण्यात आले होते. म्हणून आज एक वर्षाने या रोपांची झाडे झाली असून मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने याच परिसरात वडाचे एक झाड लावून वर्षपूर्ती साजरी करण्यात आली.
गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून पावसाळा नाही तर पाण्याचा सोहळा म्हणत सेलू शहरातील निसर्गप्रेमी नागरिकांना आवाहन करत मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला होता मात्र यावर्षी कोरोना संसर्गाचे सावट सर्वत्र असल्यामुळे छोटेखानी पद्धतीने वर्षपूर्ती साजरी करण्यात आली.
या वर्षपूर्तीच्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार श्री डी.व्ही.मुळे साहेब,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी सहकार्य करणारे डॉ.श्री संजय हरबडे यांच्या हस्ते वडाचे रोप लावण्यात आले.
सेलू शहराच्या इतिहासात अनेक वृक्षारोपन दरवर्षी झाले मात्र अनोख्या पद्धतीने वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करत सहस्त्र घन वन प्रकल्प हा भावी पिढीसाठी आदर्श ठरला आहे या शब्दात डी.व्ही.मुळे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोरया प्रतिष्ठान परिवाराने घेतलेल्या परिश्रमाचे तोंडभरून कौतुक केले. डॉ.संजय हरबडे यांनी प्रास्ताविक केले तर मोरया प्रतिष्ठानच्या वतीने सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार अभिजित राजूरकर यांनी मानले.
मोरया प्रतिष्ठान च्या या उपक्रमामुळे सेलू शहरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत असून असेच उपक्रम त्यांनी सार्वजनिक ठिकाणी नियोजन करून न्यावेत अशी अपेक्षा जनतेकडून होत आहे.
COMMENTS