श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या नवरात्र संगीत महोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
नरेंद्र येरावार उमरी
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तिमय वातावरणात आणि सुरेल संगीताच्या स्वरांनी पंढरी नगरीत नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आयोजित नवरात्र संगीत महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. या महोत्सवात कृष्णराज लवेकर आणि ज्योती गोराणे यांच्या सुरेल स्वरांची पहिली माळ रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आली.
नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि श्रद्धेचा संगम मानला जातो. या पवित्र पर्वात संगीतसेवेच्या माध्यमातून देवीच्या चरणी स्वरांची सेवा अर्पण करण्याची परंपरा भक्तांच्या मनात विशेष स्थान निर्माण करते. मंदिर समितीच्या वतीने आयोजित या संगीत महोत्सवामुळे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भक्तिसंगीताचा आनंद अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
कृष्णराज लवेकर आणि ज्योती गोराणे यांच्या स्वरांनी संगीत महोत्सवाची सुरुवात झाल्याने वातावरणात भक्तिरसाची अनुभूती निर्माण झाली. सुरेल गायनातून रुक्मिणी मातेच्या चरणी संगीतसेवा अर्पण करण्याचा हा उपक्रम नवरात्रोत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.या कार्यक्रमाला मंगेश जवळेकर परभणी यांनी संवादिनीची,तर विश्वेश्वर जोशी कोलंबिकर मृदंग,हरिप्रसाद बाळासाहेब पांडे मांजरमकर यांनी सुरेल तबल्याची साथ दिली...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला हा संगीत महोत्सव नवरात्रोत्सवातील भक्तिमय सोहळ्याचे आकर्षण ठरत आहे. भक्ती आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ साधणाऱ्या या उपक्रमामुळे पंढरीतील धार्मिक वातावरणात अधिकच चैतन्य निर्माण झाले आहे.

COMMENTS