नांदेड दि. ५
प्रा. नारायण शिंदे यांच्या सहचारिणी दिवंगत सौ. लताबाई शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण विचारमंचच्या वतीने प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केवळ 'सुवासिनींचे जेवण' असा औपचारिक कार्यक्रम न करता, मंचाच्या वतीने महिलांना वैचारिक मेजवानी देण्यात आली. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. सौ. मथुताई सावंत आणि प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिवाजीराव शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदनाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अविधवा नवमीचे औचित्य साधून यावेळी विचारमंचाच्या स्मृतिचिन्हाची (नांगर व ग्रंथ असलेले प्रतीक) पूजा करण्यात आली.
वैचारिक प्रबोधनाच्या ह्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सौ. मथुताई सावंत यांचे सौ. गीतांजली रत्नाकर शिंदे हिने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सौ. कल्पनाताई गोविंदराव मेथे यांनी आपल्या तीन मुलांना (एक प्राध्यापक, दुसरा डॉक्टर आणि तिसरा इंजीनियर) उच्चशिक्षित करण्यासाठी परिश्रम घेतले. आपले कुटुंब एकविचाराने एकसंघ राहिले पाहिजे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. याबद्दल सौ. कल्पनाताई गोविंदराव मेथे यांना 'आदर्श गृहदेवता' म्हणून सौ. मथुताई सावंत व सौ. वंदनाताई शिंदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सौ. लताबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात आला.
सौ. स्मिता महेश गव्हाणे यांनी 'मोबाइलचा अतिवापर आणि त्याचे संसारावरील दुष्परिणाम' तसेच 'महिलांमधील अंधश्रद्धा आणि कौटुंबिक गैरसमज' या विषयावर सविस्तर विचार मांडले. सौ. मथुताई सावंत यांनी 'बदलत्या काळानुसार स्त्रियांनी आपली वैचारिक भूमिका बदलली पाहिजे. विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. आपल्या संसारात आपलं माहेर आवश्यकतेपेक्षा अधिक डोकावले नाही पाहिजे, याची काळजी घ्यावी. विविध क्षेत्रांत सक्रिय सहभागी होऊन महिलांनी आपल्या भूमिका आणि आपले अनुभव लिहावेत.' असे मत व्यक्त केले.
कु. स्वरा शिंदे हिने काही बालगीते सादर केली.
सौ. वनिता देवसरकर यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर लिखित 'महानायिका' हे चरित्र सर्व महिलांना भेट दिले.
यावेळी सौ. नंदाताई आनंदराव कल्याणकर, सौ. साधनाताई शिवाजीराव देशमुख, सौ. वैशालीताई व्यंकटी पावडे, सौ. रत्नप्रभाताई गणेशराव जाधव, सौ. रेणुकाताई भगवानराव राउतखेडकर, सौ. मंजूषाताई प्रकाशराव जाधव, सौ. ज्योतीताई गणेशराव कदम, सौ. सीमाताई ज्ञानेश्वर शिंदे, सौ. कल्पना आनंद शिंदे, सौ. रूपाली पुंडलिक शिंदे, सौ. प्रेमला भास्कर शिंदे, सौ. अश्विनी सुधाकर शिंदे, सौ. निर्मला रामेश्वर शिंदे, सौ. शुभांगी किरण शिंदे, कु. ऋतुजा, कु. अनुजा, कु. समीक्षा, कु. कार्तिकी व कु. काव्या शिंदे इ. महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ऊर्मिला माने हिने केले. कु. सई किरण शिंदे हिने आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन सौ. कविता प्रफुल्ल पाटील यांनी केले होते.

COMMENTS