नांदेड: केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सिटू (CITU) कामगार संघटनेच्या वतीने नांदेड शहरात धडक 'जेल भरो' आं...
नांदेड: केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सिटू (CITU) कामगार संघटनेच्या वतीने नांदेड शहरात धडक 'जेल भरो' आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात सुमारे साडेतीन हजार कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यामध्ये आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांची उपस्थिती लक्षणीय होती. कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नांदेड शहरातील वातावरण काही काळ पूर्णपणे आंदोलनमय झाले होते. हातात लाल झेंडे घेऊन कामगारांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर हादरवून सोडला.
वजीराबाद पोलिसांकडून अटक आणि सुटक
आंदोलनादरम्यान हजारो कामगार रस्त्यावर उतरल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. वजीराबाद पोलिसांनी आंदोलनकर्त्या कामगारांना अटक केली आणि त्यानंतर सर्वांची सुटका केली. सुटकेनंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.जिल्हा परिषदेसमोर जाहीर सभा आणि निवेदन
आंदोलनादरम्यान नांदेड जिल्हा परिषद परिसरात भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेला ज्येष्ठ कामगार नेते कॉ. विजय गाभने यांनी संबोधित करत सरकारच्या कामगारविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. सभेच्या समाप्तीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रमुख मागण्या:
केंद्र सरकारने लादलेल्या चारही श्रम संहिता रद्द कराव्यात.
जनसुरक्षा कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करावी.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिटूच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणातील सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात.
आंदोलनाचे नेतृत्व
या भव्य आंदोलनाचे नेतृत्व सिटू कामगार संघटनेच्या राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्षा कॉ. उज्ज्वला पडलवार, जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, सिटू राज्य कमिटी सदस्य कॉ. करवंदा गायकवाड, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. लता गायकवाड, आणि आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षा कॉ. शीलाताई ठाकूर यांनी केले.
तसेच राज्य कमिटी सदस्य कॉ. वर्षाताई सांगडे, कॉ. सुनीता पाटील, कॉ. आम्रपाली कांबळे, दिगंबर काळे, DYFI चे तालुका अध्यक्ष कॉ. जयराज गायकवाड, कॉ. दिगंबर घायाळे, प्रफुल कऊडकर, कॉ. मंगेश वट्टेवाड, आणि कॉ. राहुल नरवाडे आदी पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाचे नियोजन व नेतृत्व सांभाळले.
साडेतीन हजारांहून अधिक कामगारांची एकजूट आणि आशा स्वयंसेविकांचा रणशिंग फुकणारा सहभाग यामुळे हे 'जेल भरो' आंदोलन सध्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आले आहे.

COMMENTS