वरील विषमतावादी वर्णव्यवस्था झुगारून समतेचा विचार रुजविण्यासाठी अनेक भारतीय संत महात्म्यांनी व समाज सुधारकांनी प्रयत्न केला. त्यामध्ये संत कबीर, संत रोहिदास, महात्मा बसवेश्वर यांचा नामोल्लेख करणे अगत्याचे ठरेल. हाच समतावादी विचार वारकरी संप्रदायातील अनेक संतांच्या विचारसरणीती आपणास दिसून येतो.मानव मुक्तीसाठी अनेक संतांनी समतेचा लढा उभारल्याचे आपणास पाहवयास मिळते. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत सेना न्हावी, संत सावतामाळी,संत चोखामेळा,संत नरहरी सोनार,संत शेख महंमद आदी संतांचा समावेश होता. तसेच या संत परंपरेत काही स्त्री संतांनी सुद्धा मोलाचे योगदान दिले. त्यामध्ये संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत वेनाबाई,संत कान्होपात्रा, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई आदी महिलांचा नामोल्लेख प्रकर्षाने करावा लागेल.
वरील सर्व संतांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन समतेचा, ममतेचा, मानवतेचा व भक्तीभावाचा संदेश जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न केला. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी इथल्या जातीप्रथा, कर्मकांड,अंधश्रद्धा व ढोंगीपणावर कडाडून हल्ला केला,’” नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ‘“ हे ब्रीद घेऊन कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून समाज जागृती करत ज्ञानाचा दीप अखंड तेवत ठेवण्याचे महान कार्य वरील सर्व संतांनी केल्याचे दिसून येते. वारकरी संप्रदाय हा समतेवर आधारित असून त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव आपणास दिसून येत नाही. संदर्भादाखल संत जनाबाई यांच्या एका अभंगाचा येथे उल्लेख करावासा वाटतो,
विठू माझा लेकुरवाळा । संगे गोपाळाचा मेळा ॥
निवृती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर ॥
गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ॥
बंका कडेवरी । नामा करांगुळी धरी ॥
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा॥
वरील अंभगातून सर्वधर्म समभाव या तत्वाची जाणीव होते . तसेच अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या महार जातीतील आघाडीचे संत म्हणजेच संत चोखामेळा होत. त्यांनीही आपल्या अभंगातून तत्कालीन धार्मिकतेच्या दांभिकपणावर ताशेरे ओढल्याचे दिसून येते.
धावी घाली विठू । आता चालू नको मंद
मज मारीती बडवे । काहीतरी अपराध
वरील अभंगातून संत चोखामेळा यांनी जातीयतेच्या नावाखाली बडव्यांनी केलेल्या अन्यायाची तक्रार विठोबाकडे केल्याचे दिसून येते. अस्पृश्य जातीत जन्म घेणे हा माझा अपराध आहे का? असा सवालही ते विठ्ठलाला विचारतात. माणूस एखादया निच्च जातीत जन्माला आला म्हणून त्यावरून त्याची सिद्धता ठरविणे हे चुकीचे आहे असाही संदेश संत चोखामेळा आपल्या अभंगातून देतात -
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा।
काय भुललासी वरलीया रंगा ॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥
नदी डोंगी परी जळ नोहे डोंगा ।
काय भूललासी वरलीया रंगा ॥
चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥
हाच मतितार्थ घेऊन जगदगुरु तुकोबाराय यांनीही
येथे जातीकुळ अप्रमाण ।
या अभंगातून जातीयतेवर प्रहार करताना दिसून येतात. अस्पृश्यतेला विरोध करताना त्यांची भूमिका समतेची होती. संत तुकोबाराय यांनी दलित संतांचे दाखले देत समतेची भूमिका मांडली.’’ अंत्यजादि योनि तरल्या हरिभजने । तयाची पुराणे भाट जाली॥ असं तुकोबाराय म्हणतात. चोखोबाराय व संत रोहिदास हे वारकरी परंपरेत वंदनीय मानले गेलेले संत होते.’’ चोखामेळा, बंका जातीया महार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी॥ वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास॥ या अभंगाच्या दोन चरणांतून तुकाराम महाराजांनी दलित संतांचे दाखले दिलेले आहेत. वारकरी संप्रदायात दलितांना जो सन्मान मिळाला त्याविषयी एकनाथ महाराज भागवतात लिहितात -
छाया देखूनि जग पळे । अंत्यंत मैळे अंत्यज”॥’
तिही धरुनि सत्संगती । आले माझिया पदाप्रती
देव द्विज तयाते वंदिती । अभिनव कीर्ती संतांची॥
यावरून वारकरी संतांची समतेची व बंधुत्वाची शिकवण आपणास जाणवते.
थोडक्यात, भारतात रुजलेली बुद्धाची समतावादी विचारसरणी वारकरी संप्रदायातही आपणास दिसून येते. तथागत भगवान बुद्धाच्या समता, बंधुता करुणा, न्याय या विचारांना पुनर्जीवित करण्याचे कार्य वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी केले असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
पुढे हाच वारसा जिवंत ठेवून समतेचा पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचे आपणास दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल अभ्यासांती भारतीय संविधानाच्या माध्यमातून तथागत बुद्धांनी व राष्ट्रसंतांनी पाहिलेले समतेचे, बंधुतेचे व न्यायाचे स्वप्न साकार केले. म्हणूनच आपणास भारतीय संविधानात तथागत बुद्धांनी अंगीकारलेले समतेचे तत्व व संतांनी उभारलेल्या समतेच्या लढ्याची पाळेमुळे दिसून येतात. वारकरी संप्रदायातील सर्वच संतांनी अंधश्रद्धा, कर्मकांड,जातीभेद झुगारुन बुद्धीप्रामाण्यवादी व विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाला देण्याचे महत कार्य केले. हाच वैज्ञानिक दृष्टिकोन सर्व भारतीयांनी अंगीकारावा हा संदेश मूलभूत कर्तव्याच्या माध्यमातून भारतीय संविधान आपणास देते. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाच्या माध्यमातून अवघ्या विश्वाचे कल्याण होवो व सर्व प्राणी मात्र सुखी राहोत ही मानवतेची मागणी केली आहे. हाच मानवी कल्याणाचा व प्राणीमात्रावरसुद्धा दया करण्याचा संदेश संविधान आपणास देते . तसेच संत तुकामांनी “ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती । “ या अभंगातून आपणास निसर्गावर, पक्षी प्राण्यावर प्रेम करा हा अनमोल संदेश दिला. तोच निसर्ग संरक्षणाचा संदेश आपणास संविधानाच्या मूलभूत कर्तव्यात पाहावयास मिळतो. ज्याप्रमाणे तथागत भगवान बुद्धांनी स्त्री-पुरुष हा भेद न मानता स्त्रियांना देखील आपल्या धम्मामध्ये सामावून घेतले तद्वतच वारकरी संप्रदाय देखील स्त्रियांना समतेची वागणूक देताना दिसून येतो. हाच स्त्री-पुरुष समतेचा विचार भारतीय संविधानाने अंगीकारला व स्त्रियांना पुरुषाप्रमाणेच मानाचे व सन्मानाचे स्थान दिले. थोडक्यात, हजारो वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी व वारकरी संप्रदायातील संतांनी पाहिलेले समतेचे व बंधुत्वाचे स्वप्न भारतीय संविधानाच्या माध्यमातून साकार करण्यासाठी आता फक्त सर्व भारतीयांनी मिळून वारकरी संप्रदायातील संताच्या विचारांचे अनुकरण करणे व भारतीय संविधानातील मूल्ये अंगिकारणे हिच आपली सर्वस्वी जबाबदारी आहे !
लेखक - प्रा. साहेबराव सोनकांबळे सावळीकर
( सहाय्यक प्राध्यापक पानसरे महाविद्यालय, अर्जापूर ता. बिलोली जि.नांदेड )
मो. ९०९६५१५९०१

COMMENTS