उमरी/प्रतिनिधी
पैशाचा गर्व करू नका, कारण शेवटी सोबत काहीच येत नाही. अहंकार दूर ठेवा, दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवू नका, देवाचं, भावाचं आणि गावाचं खाऊ नका. चंदनासारखे जगा, जे स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देते. मनुष्य जसे कर्म करतो तसेच त्याला भोगावे लागते, असे परखड विचार आचार्य गजेंद्र चैतन्य महाराज यांनी व्यक्त केले.
उमरी येथील पुरातन व जागृत देवस्थान असलेल्या श्री वामनतीर्थ महादेव मंदिरात भव्य शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू असून या कथेला पंचक्रोशीतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
आयोजित या सात दिवसीय शिवमहापुराण कथेचे पठण आचार्य गजेंद्र चैतन्य महाराज करीत आहेत. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
मनुष्य जन्माचे सार्थक करा असे सांगताना आचार्य गजेंद्र चैतन्य महाराज म्हणाले,
८४ लक्ष योनीनंतर मिळालेला हा मनुष्य जन्म अत्यंत दुर्मिळ आहे. या जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी प्रत्येकाने कथा, कीर्तन आणि संतसंगती केली पाहिजे. संसारात राहूनही परमार्थ कसा करावा याचे सुंदर विवेचन त्यांनी शिवपुराणातील दाखल्यांसह केले.
आजच्या काळात माणूस पैशाच्या मागे धावत आहे, नाती विसरत आहे. पण रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जायचे आहे, याची जाणीव ठेवा. त्यामुळे अहंकार सोडा आणि सेवाभाव जपा, असे आवाहन त्यांनी केले.
या कथामहोत्सवामुळे उमरी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून हर हर महादेव च्या गजरात संपूर्ण गाव दुमदुमून गेले आहे.

COMMENTS