किनवट : प्रत्यक्ष फिरून शिवारफेरी पूर्ण करा , आपल्या गावाला काय हवं त्याचा आराखडा तयार करा, वनोपजाचे संरक्षण व विक्रीतून गावाला समृद्ध करा ,...
किनवट : प्रत्यक्ष फिरून शिवारफेरी पूर्ण करा , आपल्या गावाला काय हवं त्याचा आराखडा तयार करा, वनोपजाचे संरक्षण व विक्रीतून गावाला समृद्ध करा , रासायनिक खते व औषधी टाळून जीवामृत , दसपर्णी अर्क वापरा , खर्च कमी करून उत्पन्न वाढवा , गट शेती करा ,सामूहिक वनसंपत्तीचे नियोजन, जैवविविधतेचे संवर्धन, लघुवनोपजाचे व्यवस्थापन, पारंपरिक ज्ञानाचा वापर आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून घेणे हेच आजच्या कार्यशाळेचं फलित आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक वनहक्क अंमलबजावणी व व्यवस्थापन समिती (CFRMC) प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय , उपविभागीय अधिकारी कार्यालय , तहसील कार्यालय यांच्यावतीने पंचायत समिती सभागृहात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी बी. सरवनन , तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर , गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे यांची प्रमुख उपस्थिति होती.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री कर्डिले असे म्हणाले की, निसर्गातील जीवसृष्टीची विविधता म्हणजे जैवविविधता होय. किनवट परिसरातील जंगले, बांबू, साग, विविध औषधी वनस्पती, वाघ, बिबट्या, अस्वल, लांडगा , हरीण, मोर, विविध पक्षी व कीटक हे सर्व मिळून त्या परिसराची जैवविविधता तयार करतात. तेव्हा याची जपणूक झाली पाहिजे.
याप्रसंगी पांढरकवडा येथील उमेद संस्थेचे सचिव अमीत कुलकर्णी यांनी ग्राम सभा सक्षमीकरण, गडचिरोली येथील सृष्टी संस्थेचे संयोजक केशव गुरनाळे यांनी आर्थिक सक्षमीकरण , यवतमाळ येथील जिल्हा व्यवस्थापक रुपेश श्रृपवार यांनी वन हक्क कायदा जनजागृती , सहायक बालाजी नरवाडे यांनी वनहक्क कायदा , वन परिक्षेत्राधिकारी धीरज मदने यांनी वन संरक्षण व संसाधन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. आदी कर्मयोगी उत्तम कानिंदे यांनी प्रास्ताविक , सूत्रसंचालन केले व आभार मानले.
याप्रसंगी सहायक प्रकल्पाधिकारी प्रदीप नाईक , विस्तार अधिकारी (पं) कैलास गायकवाड , जिल्हा कन्व्हर्जन समिती सदस्य तुकाराम पेंदोर , गजानन डवरे , देवगिरी कल्याण आश्रम जळगावचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. उत्तम धुमाळे , जिल्हा सचिव विश्वनाथ नखाते , सामाजिक कार्यकर्ते विजय पवार , वनपाल मनोज गुरसाळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी वनहक्क तालुका व्यवस्थापक महेश राठोड व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे गणेश कटकमवार यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS