नांदेड, ७- जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली व बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीची टप्प्याटप्प्याने प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्हा परिषदेत ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे ३ हजार ६०० पत्रांचे स्कॅनिंग करून ई-प्रणालीद्वारे कार्यवाही करण्यात आली आहे. प्रथम मुख्यालय, त्यानंतर तालुकास्तर आणि तिसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत स्तरावर ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या तक्रारी तसेच फाइल्स कोणत्या कार्यालयात, कधी प्राप्त झाल्या आणि त्यावर कोणती कार्यवाही झाली याचा अचूक मागोवा घेता येणार असून जलद निपटारा होण्यास मदत होणार आहे.
कार्यालयीन शिस्त आणि वेळेचे पालन अधिक प्रभावी करण्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून भविष्यात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद आणि वेतन प्रक्रियाही या प्रणालीशी जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरच्या एका महिन्यात १२ हजार ६२७ घरकुलांची उभारणी पूर्ण झाल्याची माहिती देताना त्यांनी ग्रामपंचायतींमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. कचऱ्याचे विलगीकरण व वर्गीकरण शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणार असून याबाबत ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती केली जाणार आहे.
आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन तसेच उमेद अभियान यांच्या अभिसरणातून विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत नांदेड जिल्हा राज्याच्या टक्केवारी बरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS