🔱 अमरनाथ गुहेतून – भाग ७ 🔱
(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
अमरनाथ यात्रेचा सर्वांत महत्त्वाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा दिवस अखेर उजाडला. खरे तर “उजाडला” म्हणणेही चुकीचे ठरेल, कारण हा दिवस सुरू झाला तो मध्यरात्रीच! दिवसभराचा प्रवास, थंडी, उंच पर्वत, विरळ ऑक्सिजन आणि भोलेनाथाच्या दर्शनाची ओढ… या सगळ्यांचे अनोखे मिश्रण मनात होते. रात्री सर्वांना सूचना दिल्या होत्या की, बरोबर दोन वाजता आंघोळ करून तयार राहायचे. पण यात्रेकरूंचा उत्साह एवढा अफाट होता की दीड वाजताच सर्वजण तयार होऊन उभे होते. कोणाच्या चेहऱ्यावर झोप नव्हती; उलट प्रत्येकाच्या डोळ्यांत फक्त एकच स्वप्न होते—“आज भोलेनाथाचे प्रत्यक्ष दर्शन होणार!” पूजा टेन्ट हाऊससमोर आधीच घोडेवाले आणि डोलीवाले आपल्या यात्रेकरूंची वाट पाहत उभे होते. ज्यांनी डोलीची व्यवस्था केली होती, त्यांना काळजीपूर्वक डोलीत बसवण्यात आले. घोड्यावर जाणाऱ्यांना मात्र जवळपास एक किलोमीटर अंतरावरील घोडा स्टँडपर्यंत पायी चालत जावे लागले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काही उत्साही यात्रेकरूंनी माझ्याकडे आग्रह धरला. “दिलीपभाऊ, आम्हाला पायी जायचं आहे. आम्ही चालू शकतो.” मी नेहमीप्रमाणे त्यांना शांतपणे समजावून सांगितले, “अमरनाथचा हा मार्ग सामान्य ट्रेक नाही. इथे सात पर्वत चढ-उतार करावे लागतात. ऑक्सिजन कमी असतो. हवामान क्षणाक्षणाला बदलते. एक छोटासा निर्णयही जीवावर बेतू शकतो. म्हणून माझ्या यात्रेत कोणीही पायी जाणार नाही. जर पायी चालण्याची इच्छा असेल तर पुढच्या वेळी माझ्यासोबत वैष्णोदेवीला या. तिथे धोका कमी आहे आणि आपण अनेक किलोमीटर आनंदाने चालतो.” माझा हा नियम अनेकांना सुरुवातीला कठोर वाटतो; पण त्यामागे फक्त आणि फक्त यात्रेकरूंची सुरक्षितता असते. काही वर्षांपर्यंत आम्ही अमरनाथचा संपूर्ण प्रवास पायी करत असू. गुहेजवळ मुक्कामही करायचो. पण काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे गुहेजवळील तंबूंचा परिसर अक्षरशः वाहून गेला. अनेक स्थानिक, घोडेवाले आणि यात्रेकरू मृत्युमुखी पडले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मृतांची संख्या शेकड्यांत होती. मात्र अधिकृत आकडेवारी खूपच कमी सांगण्यात आली. त्या दुर्दैवी घटनेनंतर माझा निर्णय कायमचा बदलला. यात्रा कितीही श्रद्धेची असली, तरी सुरक्षितता ही सर्वांत मोठी जबाबदारी आहे.
रात्री दोनच्या सुमारास आमचा प्रवास सुरू झाला. आकाशातून रिमझिम पाऊस पडत होता. बालटालहून पुढे डुमेल गेटवर सर्व यात्रेकरूंना उतरवून अत्यंत कडक सुरक्षा तपासणी करण्यात आली. भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस अत्यंत दक्षतेने प्रत्येक यात्रेकरूची तपासणी करत होते. त्यांचे कर्तव्य पाहून पुन्हा एकदा भारतीय जवानांबद्दल मन कृतज्ञतेने भरून आले. तपासणी संपल्यानंतर खरी कसोटी सुरू झाली—आपापला घोडा आणि डोलीवाला शोधण्याची! पहिल्यांदा आलेल्या यात्रेकरूंना तर हे अशक्यच वाटत होते. हजारो घोडे, हजारो डोलीवाले आणि सर्वांच्या अंगावर जवळजवळ सारखाच पोशाख! मला गंमत म्हणून वाटले, “हे काम तर आयएएस परीक्षा पास होण्यापेक्षाही कठीण आहे!” पण आश्चर्य म्हणजे, आम्हाला ओळखण्यात घोडेवाले आणि डोलीवाले एकदाही चुकले नाहीत. ते दूरवरूनच आपल्या यात्रेकरूंना ओळखून हसतमुखाने जवळ आले. अनेक वर्षांचा अनुभव आणि त्यांची निरीक्षणशक्ती खरोखरच विलक्षण होती.
आमचा प्रवास हळूहळू सुरू झाला. एका बाजूला खोल दऱ्या, दुसऱ्या बाजूला उंचच उंच पर्वत, मधूनच धावणारे धबधबे, धुक्याची चादर आणि सतत “हर हर महादेव”च्या घोषणा… हा अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे. सुमारे सात किलोमीटरवर असलेल्या मराठी टॉप येथे आम्ही विश्रांती घेतली. सर्व यात्रेकरूंनी गरम चहा आणि नाश्ता केला. आमच्यासोबत आलेल्या घोडेवाल्यांनाही आणि डोलीवाल्यांनाही प्रेमाने नाश्ता करून दिला. रस्त्यात अनेक मोफत लंगर असतात. गरम जेवण, चहा, कॉफी, फळे, मिठाई, खिचडी, पुलाव—काय नाही मिळत! तरीही स्थानिक घोडेवाले आणि डोलीवाले बहुतेक वेळा लहानशा हॉटेलमध्ये पैसे देऊनच जेवतात. त्यामागे त्यांची स्वतःची काही कारणे असावीत; पण त्यांचे कष्ट पाहून त्यांच्याबद्दल आदरच वाटला. प्रवास जसजसा पुढे सरकत होता, तसतशी चढाई अधिक कठीण होत होती. काही वेळाने सकाळी पायी जाण्याचा आग्रह धरणारे यात्रेकरू स्वतःहून माझ्याकडे आले आणि म्हणाले, “दिलीपभाऊ, आम्ही चुकीचे होतो. तुमचा निर्णय शंभर टक्के योग्य होता. जर पायी निघालो असतो, तर अर्ध्या वाटेतच दमलो असतो.” त्यांचे हे शब्द ऐकून मला समाधान वाटले. आयोजक म्हणून यात्रेकरूंना सुरक्षितपणे दर्शन घडवणे, हेच माझे सर्वांत मोठे यश असते.
दुपारी जवळपास एकच्या सुमारास आम्ही अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ पोहोचलो. इतका मोठा प्रवास करूनही अंतिम टप्पा अजून बाकीच होता. घोडा स्टँडपासून गुहेपर्यंत जवळपास एक किलोमीटर अंतर पार करावे लागते आणि त्यानंतर सुमारे तीनशे पायऱ्या चढाव्या लागतात. घोड्यावर बसून आलेले अनेक यात्रेकरूही हा शेवटचा टप्पा पाहून हबकले. काहींनी शेवटचा टप्पा डोलीने पूर्ण केला. प्रत्येक काही पायऱ्यांनंतर भारतीय सैन्याचे जवान यात्रेकरूंना थांबून श्वास घेण्याचा सल्ला देत होते. एवढ्या उंचीवर ऑक्सिजन कमी असल्यामुळे घाई करणे धोकादायक ठरू शकते. आणि मग तो क्षण आला… ज्या क्षणासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला होता… ज्या क्षणासाठी महिनोनमहिने तयारी केली होती… ज्या क्षणासाठी लाखो भक्त वर्षभर वाट पाहतात… बर्फातून साकारलेले स्वयंभू शिवलिंग प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे होते! क्षणभर वेळ थांबला. डोळे आपोआप मिटले. हात जोडले गेले. मन पूर्णपणे शांत झाले. अंगावरील सर्व थकवा एका क्षणात नाहीसा झाला. भोलेनाथाच्या चरणी उभे राहिल्यावर शरीराने किती कष्ट घेतले, याची जाणीवही उरली नाही. गुहेमध्ये शिवलिंगासोबत बर्फातून साकारलेल्या माता पार्वती आणि श्रीगणेशाच्या आकृत्याही स्पष्ट दिसत होत्या. दरवर्षी निसर्गाच्या अद्भुत चमत्कारातून या आकृती तयार होतात, हे पाहून परमेश्वराच्या सृष्टीचे गूढ पुन्हा एकदा जाणवले.
पवित्र जल अंगावर शिंपडले. संपूर्ण कुटुंबासाठी, यात्रेकरूंसाठी, मित्रांसाठी, समाजासाठी आणि देशासाठी मनोभावे प्रार्थना केली. मंदिर समितीकडून १७१० रुपयांचा पाच ग्रॅम वजनाचा चांदीचा पवित्र शिक्का स्मृतिचिन्ह म्हणून घेतला. दर्शनानंतर जवळच्या लंगरमध्ये थोडासा प्रसाद ग्रहण केला. इतके लंगर, इतकी सेवा आणि इतके प्रेम पाहून मन भारावून गेले. हजारो स्वयंसेवक कोणत्याही अपेक्षेशिवाय यात्रेकरूंची सेवा करत होते. भारतीय संस्कृतीतील “अतिथी देवो भव” आणि “नरसेवा ही नारायण सेवा” याचे हे जिवंत उदाहरण आहे.
थोड्याच वेळात परतीचा प्रवास सुरू झाला आणि निसर्गाने पुन्हा आपले रूप बदलले. मुसळधार पाऊस सुरू झाला. घोड्यावर बसून उतरताना अनेक यात्रेकरूंना नकळत डुलकी लागत होती. घोडेवाले वारंवार सावध करत होते—“साहब… सोना मत… सीधे बैठो…” त्यांचा आवाज सतत कानावर पडत होता. संध्याकाळी साधारण सहा वाजता आम्ही पुन्हा बालटाल बेस कॅम्पवर पोहोचलो. प्रत्येक यात्रेकरू सुरक्षित परतला आहे ना, याची खात्री करण्यासाठी नावानिशी चौकशी सुरू केली. सुमारे नव्वद टक्के यात्रेकरू आधीच कॅम्पवर पोहोचले होते. घोड्यावरून परत येणाऱ्यांना जास्त वेळ लागला; पण डोलीने येणारे अनेकजण सकाळी अकरापासूनच खाली पोहोचले होते. म्हणजेच डोली आणि घोडा यामध्ये जवळपास सहा तासांचा फरक पडला होता. टेन्टमध्ये पोहोचताच थकलेल्या शरीराला मसाज करून घेतला. शरीराला त्याची नितांत गरज होती. लंगरमध्ये असंख्य पदार्थ मांडले होते; पण दिवसभराच्या श्रमांमुळे खाण्याची इच्छाच होत नव्हती. कसाबसा दोन घास खाल्ले, गरम चहा घेतला आणि काही क्षणांतच निद्रादेवीच्या कुशीत हरवून गेलो.
त्या रात्री झोपताना मनात फक्त एकच विचार होता—“आज आयुष्य धन्य झाले!” भोलेनाथाचे दर्शन झाले होते. शरीर थकले होते; पण मन समाधानाने, कृतज्ञतेने आणि अवर्णनीय आनंदाने भरून गेले होते.
हर हर महादेव!
(क्रमशः…)

COMMENTS