NEET पेपरफुटी- सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. फॅक्टरीत निर्जीव वस्तू तयार होतात - डॉक्टर नाही.

भारतामध्ये शिक्षणाला नेहमीच “विद्या” म्हणून पाहिले गेले. गुरूला देवाचे स्थान देणारी ही संस्कृती आहे. “आचार्य देवो भव” हे केवळ वाक्य नाही; ती...
भारतामध्ये शिक्षणाला नेहमीच “विद्या” म्हणून पाहिले गेले. गुरूला देवाचे स्थान देणारी ही संस्कृती आहे. “आचार्य देवो भव” हे केवळ वाक्य नाही; ती आपल्या समाजाची हजारो वर्षांची नैतिक परंपरा आहे. पण आज त्या परंपरेसमोर उभे राहिलेले वास्तव अतिशय भीषण आणि वेदनादायक आहे.

आज काही कोचिंग क्लासेस स्वतःला “डॉक्टर घडवणारी फॅक्टरी” म्हणवून घेतात आणि समाज टाळ्या वाजवतो. पण ज्याj ठिकाणी शिक्षण हा संस्कार नसून व्यवसाय होतो, जिथे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांपेक्षा रँक, बॅनर आणि फीचे आकडे महत्त्वाचे होतात, तिथे डॉक्टर नव्हे तर केवळ स्पर्धेच्या मशीन तयार होतात. फॅक्टरीत निर्जीव वस्तू तयार होतात. डॉक्टर मात्र सजीव माणसांच्या वेदना, भावना आणि विश्वास सांभाळणारा व्यक्ती असतो. एका रुग्णाचे संपूर्ण आयुष्य ज्या हातावर विसंबून असते, तो डॉक्टर केवळ मार्कांच्या स्पर्धेतून घडत नाही; तो मूल्यांमधून घडतो.

पण आज वैद्यकीय शिक्षणव्यवस्था पाहताना प्रश्न पडतो — आपण भविष्यातले डॉक्टर घडवत आहोत की फक्त सीट मिळवणारे उमेदवार? अलीकडील NEET पेपरफुटी प्रकरणाने देश हादरला. लाखो विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून दिलेल्या परीक्षेच्या पवित्रतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. देशभरातून संताप व्यक्त झाला. विशेषतः महाराष्ट्रातील लातूर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. एकेकाळी “लातूर पॅटर्न” हा परिश्रम, गुणवत्ता आणि यशाचे प्रतीक मानला जात होता. पण आज त्याच नावाभोवती संशय, पैसा, पेपरफुटी आणि शिक्षणमाफिया अशा शब्दांचे सावट दिसू लागले आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) काही शिक्षक आणि संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले असून निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील एका प्रथितयश कोचिंग क्लास चालकाची ८-९ तास सीबीआयची २८ सदस्यांची समिती चौकशी करते, त्यांचा मोबाईल फोन आणि संस्थेचा डेटा तपासासाठी जप्त करते. अटक झाली किंवा नाही हे महत्वाचे नाही, परंतु देशव्यापी गुन्ह्यात आपली चौकशी होती हे कशाचे द्योतक आहे? सीबीआयच्या प्राथमिक तपासात काही विद्यार्थ्यांना गुप्त मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सांगितल्याचा आरोप समोर आला आहे. तपास अद्याप सुरू असून अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. परंतु प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही. प्रश्न आहे त्या संपूर्ण मानसिकतेचा, जिथे शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे साधन न राहता करोडो रुपयांचा बाजार बनते.
आज NEET ही परीक्षा केवळ एक प्रवेशपरीक्षा राहिलेली नाही. ती लाखो कुटुंबांचे स्वप्न, त्याग आणि भविष्य आहे. एखाद्या शेतकऱ्याने जमीन विकून मुलाला कोचिंगला पाठवलेले असते. एखादी आई स्वतःचे दागिने गहाण ठेवून फी भरत असते. एखादा विद्यार्थी मोबाईल बाजूला ठेवून दोन-दोन वर्षे स्वतःला एका खोलीत बंद करून अभ्यास करत असतो. त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा विश्वास जर पैशासाठी विकला जात असेल, तर हा केवळ गुन्हा नसून सामाजिक विश्वासघात आहे.
कोचिंग उद्योगाने भारतात शिक्षणाची व्याख्याच बदलून टाकली. चांगली आणि तितकीच वाईट. आज अनेक शहरांमध्ये शिक्षण म्हणजे शाळा नसून कोचिंग क्लासेस झाले आहेत. मूळ शैक्षणिक संस्था ओस पडल्या आहेत. विद्यार्थी आता “विद्यार्थी” राहिले नाहीत; ते “रिझल्ट प्रॉडक्ट” झाले आहेत. त्यांच्या मार्कांवर जाहिराती छापल्या जातात. त्यांच्या चेहऱ्यांवर होर्डिंग्ज उभे राहतात.
त्यांच्या यशावर करोडोंचा व्यवसाय चालतो. प्रसिद्धीची हाव इतक्या थराला जाऊ शकते याचं आज दुःख आहे. ८-१० हजार विद्यार्थ्यांपैकी ५०-६० विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले की शहरभर बॅनर लावले जातात. “आमच्या क्लासचा AIR-1”, “आमच्या क्लासचे १०० सिलेक्शन” अशा घोषणा दिल्या जातात. पण उरलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे काय? त्यांच्या अपयशाची जबाबदारी कोण घेणार? त्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार कोण करणार? प्रत्येक विद्यार्थी तितक्याच बुद्धिमत्तेचा असू शकत नाही परंतु या क्लासेस मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांला एकच ध्येय दिलं जातं- एमबीबीएस आणि तेही फक्त मोठ्या सरकारी कॉलेजमध्ये. या दबावात असंख्य पालक आणि विद्यार्थी मानसिक तणाव आणि आत्महत्येला बळी पडत आहेत. नीट २०२६ चा पेपर फुटल्यानंतर आतापर्यंत ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली. ही जबाबदारी कोणाची ? एका १७-१८ वर्षांच्या मुलाच्या मनावर आपण किती प्रचंड दडपण टाकतो आहोत, याची कल्पना तरी आहे का? दरवर्षी आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. नैराश्य, चिंता, अपूर्णतेची भावना — हे आता स्पर्धा परीक्षांचे नवीन “साइड इफेक्ट्स” झाले आहेत. शिक्षणाचा उद्देश काय असतो?व्यक्तिमत्त्व घडवणे. नैतिकता शिकवणे. समाजासाठी संवेदनशील नागरिक तयार करणे. ”आज विद्यार्थ्यांना शिकवले जाते; “रँक मिळवा, बाकी काही महत्त्वाचं नाही.” “यश मिळवा, मार्ग कोणताही असो.”हीच मानसिकता पुढे जाऊन भ्रष्टाचाराला जन्म देते. जर एखादा शिक्षकच विद्यार्थ्यांना शॉर्टकट शिकवत असेल, तर त्या विद्यार्थ्याकडून आपण प्रामाणिक डॉक्टर, अधिकारी किंवा नागरिक होण्याची अपेक्षा कशी ठेवणार?
मी स्वतः गेली २६ वर्षे डॉक्टर म्हणून काम करत आहे. आजही माझ्या बारावीच्या शिक्षकांच्या पायांवर डोकं ठेवताना मला अभिमान वाटतो. त्यांनी आम्हाला फक्त फिजिक्स-केमिस्ट्री शिकवली नाही; त्यांनी प्रामाणिकपणा शिकवला. संघर्ष शिकवला. अपयश स्वीकारायला शिकवलं. त्यांच्या वर्गात मार्कांपेक्षा माणूसपण मोठं होतं.आज मात्र काही ठिकाणी शिक्षक हा “ब्रँड” झाला आहे. त्याच्या फोटोचे कटआउट्स उभे राहतात. त्याच्या नावाने साम्राज्य उभं राहतं. विद्यार्थी आणि पालक हे ग्राहक बनतात. आणि जेव्हा पैसा आणि प्रसिद्धी यांचा हव्यास मर्यादा ओलांडतो, तेव्हा शिक्षण क्षेत्रातही गुन्हेगारी प्रवेश करते. पेपरफुटी ही अचानक घडणारी घटना नसते. ती अनेक स्तरांवरच्या नैतिक अधःपतनाचा परिणाम असते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, काही पालकांनी लाखो रुपये देऊन प्रश्नपत्रिका मिळवण्याचा प्रयत्न केला. हे वास्तव अधिक भयावह आहे. कारण भ्रष्टाचार फक्त शिक्षकांमध्ये नाही; तो समाजाच्या मानसिकतेतही शिरतो आहे. जे पालक आपल्या मुलाला चुकीच्या मार्गाने डॉक्टर बनवू इच्छितात, त्यांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा; ‘उद्या तुमच्याच कुटुंबातील व्यक्तीवर ऑपरेशन करणारा डॉक्टर जर अशाच मार्गाने पुढे आलेला असेल, तर तुम्हाला सुरक्षित वाटेल का?’ डॉक्टर होणे म्हणजे केवळ MBBS सीट मिळवणे नाही. तो विश्वासाचा व्यवसाय आहे. एक रुग्ण जेव्हा डॉक्टरच्या हातात आपल शरीर सोपवतो तेव्हा तो किंवा ती डॉक्टर त्या रुग्णाची आई व्हायला हवी. आणि हे शिकवण त्या शिक्षकाची जबाबदारी असते. पेपर फोडून मुलांना वाममार्ग दाखवणारा माणूस नराधम असतो. गुरु नाही.
रुग्ण जेव्हा डॉक्टरकडे येतो, तेव्हा तो केवळ औषध मागत नाही; तो आपले आयुष्य त्या व्यक्तीकडे सोपवत असतो. जर त्या प्रवासाची सुरुवातच फसवणूक, पेपरफुटी आणि पैशाच्या जोरावर झाली असेल, तर त्या व्यवस्थेचे भवितव्य किती भयानक असेल याची कल्पना करवत नाही.
आपल्या देशात एखाद्या डॉक्टरच्या चुकीमुळे रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. मग लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कोणती कारवाई व्हायला हवी?

कारण त्यांनी केवळ एक परीक्षा खराब केलेली नसते; त्यांनी संपूर्ण पिढीचा शिक्षणव्यवस्थेवरील विश्वास मोडलेला असतो. NEET पेपरफुटी प्रकरण हे केवळ कायदेशीर प्रकरण नाही. ते सामाजिक आरशात दिसणारे आपले कुरूप प्रतिबिंब आहे . आपण मुलांना काय शिकवत आहोत? प्रामाणिकपणा की शॉर्टकट? संघर्ष की पैसे?

विद्या की व्यवसाय? आज गरज आहे ती केवळ दोषींना शिक्षा देण्याची नाही; तर शिक्षणव्यवस्थेचे आत्मपरीक्षण करण्याची आहे. कोचिंग क्लासेसवर कठोर नियंत्रण आवश्यक आहे. प्रवेश परीक्षांची संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करावी लागेल. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला केंद्रस्थानी ठेवावे लागेल.“रँक”पेक्षा “मूल्य” महत्त्वाचे आहेत, हे पुन्हा शिकवावे लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचारी मानसिकता असलेल्या शिक्षकांनी पुन्हा शिक्षक व्हावे लागेल. ब्रँड नव्हे. व्यापारी नव्हे. तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे मार्गदर्शक. कारण भारताची खरी ताकद ही IIT, AIIMS किंवा रँकमध्ये नाही. ती त्या शिक्षकांमध्ये आहे, जे अजूनही प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना घडवत आहेत. ती त्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, जे अजूनही दिवसरात्र मेहनत करून स्वप्न पाहतात. आणि ती त्या पालकांमध्ये आहे, जे अजूनही मुलांना मूल्य शिकवतात . पेपरफुटीमुळे प्रश्नपत्रिका लीक होऊ शकते; पण जर आपण सावध झालो नाही, तर पुढच्या पिढीचे नैतिक मूल्यही लीक होतील. आणि तो दिवस या देशासाठी सर्वात मोठा पराभव असेल. यावर्षीच्या पेपरफुटीनंतर ३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी वाचली. जर आज या गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही तर अजून किती निष्पाप जीव जातील माहीत नाही.
नोंद: ही चर्चा सर्वसमावेशी नाही किंवा ती सर्वांना लागू होत नाही. ही चर्चा केवळ अशा मानसिकतेत जगणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना लागू होते.

  • डॉ नितीन जोशी
  • एमबीबीएस; डी एन बी (मेडिसिन)
  • डीएनबी (गॅस्ट्रोएंटरोलॉजी)

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group