वसमतमध्ये रंगले बालवाचकांचे साहित्य संमेलन वसमत परभणीच्या अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे बालवाचक साहित्य संमेलन हा नवीन पिढी घडविणारा अभिनव उपक्रम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांनी केले. चौथ्या अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, की प्रगल्भ मनाचा माणूस वाचनातून घडतो. त्यासाठी घरात पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी बालकुमारांवर अवांतर वाचनाचे संस्कार जाणीवपूर्वक केले पाहिजेत.
बालकांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने २ एप्रिल रोजी वसमत येथे आयोजित चौथ्या अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनाची अध्यक्ष होती कु. श्रावणी देवरे आणि स्वागताध्यक्ष होती कु. राधिका ढोणे. या संमेलनाचे वैशिष्ट्य असे, की उत्कृष्ट बालवाचकांनाच हा सन्मान दिला जातो. संमेलनाचे उद्घाटन कथाकार राजा कदम, गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, सूर्यकांत देशमुख, ज्योती चौंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. सृजनशील शिक्षकांच्या कल्पनेतून हे अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन साकारले आहे.
अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राच्या शंकर लेकुळे बालसाहित्य नगरीतील ह्या साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांचे कथाकथन, नाटिका, बालकविता संमेलन, लेखकांचे मार्गदर्शन, वाचलेल्या पुस्तकांवर गटचर्चा अशी सत्रे पार पडली.
समारोप सत्रात साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांनी बालकांनी वाचनाच्या दुनियेत कसे हरवून जावे. लिहिते कसे व्हावे याबाबतीत मार्गदर्शन केले. आजचे चांगले वाचक हेच उद्याचे लेखक असतात, याविषयी रसाळ भाषेत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी सतीश काष्टे, एल. बी. एस. शाळेचे संचालक संदीप चव्हाण, गंगाधर साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनात हिंगोली जिल्ह्यातील १८ शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
डॉ. सावंत यांच्या हस्ते उत्कृष्ट बालवाचकांचा सन्मान करण्यात आला. एल. बी. एस. स्कूल येथील मुंजाजी जोगदंड सभागृहात पार पडलेल्या ह्या बालवाचक साहित्य संमेलनाचे शैक्षणिक व साहित्यिक वर्तुळात कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप धामणे, ज्योती चौंडे, श्याम कोटगिरे, उषा घोडके यांनी केले. अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. बालवाचक साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी उषा घोडके, शिल्पा चामणीकर, डॉ. नागनाथ गिनगिने, सुरेखा जवळगे, शाम राऊत, गिराम, गजानन चौधरी, अजय महाजन, शंकर लेकुळे, शिवदास पोटे, जयश्री पाटील, येरावार, बाळकृष्ण वळसे, मुंजाजी जोगदंड, समाधान शिंदे, चव्हाण, राजेश दुधाटे यांनी परिश्रम घेतले .

COMMENTS