शिक्षण क्षेत्रात तब्बल 34 वर्षे निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परतेने सेवा बजावणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव मारोतीराव कल्याणपाड यांचा कार्यसेवागौरव नुतन विद्यालय भोकर येत दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात येत आहे.
शिक्षक, संघटक, पत्रकार आणि समाजाभिमुख कार्यकर्ते अशी बहुआयामी ओळख असलेल्या व्यंकटराव कल्याणपाड सर यांचे कार्य शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
२९ फेब्रुवारी १९६८ रोजी अंबुलगा बु. ता. मुखेड जि. नांदेड येथे जन्मलेल्या व्यंकटराव कल्याणपाड यांनी ३ एप्रिल १९९२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवेला प्रारंभ केला. अंबुलगा, कासारखेडा, जांभरून, पांडुरंगनगर, बेंबर (ता. भोकर नुतन भोकर) आदी विविध शाळांमध्ये त्यांनी शिक्षक, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली.28 फेब्रुवारी 2026 रोजी पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नुतन येथून सेवानिवृत्त होत आहेत प्रत्येक ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता वाढ, शाळेतील शिस्त, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम आणि पालक-शाळा समन्वय यावर त्यांनी विशेष भर दिला.
शिक्षणासोबतच त्यांनी पत्रकारितेतही आपली वेगळी छाप उमटवली. महाविद्यालयीन वार्षिकांचे संपादन, ग्रामीण वार्ताहर म्हणून विविध दैनिकांतून लेखन, कथा, कविता आणि सामाजिक विषयांवरील लेख प्रकाशित करून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. युवकांना नोकरीविषयक मार्गदर्शन, अर्ज भरणे, स्पर्धा परीक्षांची माहिती देणे या माध्यमातून अनेकांना शासकीय सेवेत संधी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
संघटनात्मक कार्यात त्यांनी सदैव आघाडी घेतली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून शिक्षकांच्या सेवा विषयक प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. बदली, पदोन्नती, वेतन, शैक्षणिक धोरणे आदी विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटना अधिक बळकट व सक्रिय झाली आहे.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना नांदेड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२२), पंचायत समिती स्तरावरील पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना सन्मानपत्र तसेच मनुष्यबळ लोकसेवा अकादमी, मुंबई यांचा ‘शिक्षकरत्न’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून १००% विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाकडूनही त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
28फेब्रुवारी 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानंतर सुद्धा त्यांचे संघटनात्मक व सामाजिक कार्य अखंड सुरू राहणार आहे. साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, तळमळ आणि शिक्षकांप्रती असलेली निष्ठा यामुळे व्यंकटराव कल्याणपाड हे शिक्षक समाजाचे विश्वासार्ह, लढवय्ये आणि प्रेरणादायी नेतृत्व व शिक्षक नेते निळकंठ राव चोंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सेवापुर्ती निमित्त शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS