सेलू, / प्रतिनिधी
योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी च्या वतीने दि. 27 जुलै आणि 28 जुलै रोजी सेलू येथे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणार्या या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेवून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या दरम्यान राबवल्या जाणार्या निवड चाचणीतून स्पर्धकांना राज्यस्तरीय संघात जाण्याची संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा योगासन स्पोर्ट् असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.शरद कुलकर्णी यांनी दिली.
योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर योगासन भारतच्या माध्यमातून देशभरातील प्रतिभांचा शोध घेवून त्यांना मंच उपलब्ध करुन देण्यात आला. त्यासाठी राज्यपातळीपासून तालुस्तरापर्यंत संघटनात्मक साखळी निर्माण करुन तळागाळातून योगासनांमधील प्रतिभांचा शोध सुरु झाला.
त्याचा परिणाम गेल्या पाच वर्षात पार पडलेल्या खेलो इंडिया, नॅशनल गेम्ससह राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा आणि नुकत्याच पार पडलेल्या एशियन स्पर्धेसह बिहार खेलो इंडिया स्पर्धेतही महाराष्ट्र संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
योगासनांमधील अशाच प्रतिभांचा शोध घेवून त्यांना प्रशिक्षण आणि पुढील स्पर्धांसाठी तयारीचा भाग म्हणून जिल्हास्तरावर अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. दि. 27 जुलै रोजी सब जुनिअर गट जुनिअर गट व सीनियर गट मुला मुलींच्या स्पर्धा व 28 जुलै रोजी सीनियर ए. बी. सी. महिला व पुरुष गटाच्या योगासन स्पर्धा नूतन योग सेंटर सेलू येथे होत असून त्यात संपूर्ण जिल्ह्यातून शंभर हून अधिक योगासनपटू सहभागी होतील असा अंदाज आहे.
या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्या योगासनपटूंनी दि. 24 जुलै पर्यंत ऑनलाईन नावे नोंदणी करावी अधिक माहितीसाठी (7588035148,) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा असोसिएशनचे सचिव देविदास सोन्नेकर, उपाध्यक्ष निखिल वंजारे, कोषाध्यक्ष संतोष कुलकर्णी, डॉ. चारुशीला जवादे सहसचिव कृष्णा कवडी स्पर्धा तांत्रिक समिती प्रमुख माधव देशपांडे यांनी केले आहे. या स्पर्धेतून राज्य संघासाठीच्या खेळाडूंची निवडही केली जाणार आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा