किनवट,दि.01 (प्रतिनिधी) : तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून, आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई जाणवू शकते. त्यामुळे किनवट तालुक्यातील सर्व संबंधित यंत्रणेने एकही गाव पेयजलापासून वंचित राहणार नाही, अशाप्रकारे नियोजन करून संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ विशेष कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश आमदार भीमराव केराम यांनी दिले.
शुक्रवारी (दि.31) दुपारी 12 वाजता साईबाबा मंदिर सभागृहात आयोजिलेल्या उन्हाळी पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्याच्या आढावा बैठकीत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार महंमद रफीक, सहायक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, पं.स.चे माजी सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता अमित गोविंदवाड, पं.स.चे विस्तार अधिकारी कैलास गायकवाड व वसंत वाघमारे यांचेसह तालुक्यातील सर्व 134 गावचे सरपंच, ग्रामसेवक,ग्रामविस्तारअधिकारी व तालुका विभाग प्रमुख उपस्थित होते.आतापासूनच तालुक्यातील पैनगंगेसोबतच नदी-नाले आटले असून जूनअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणीटंचाई जाणवू शकते म्हणून पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक आहे. त्याकरिता सदर बैठकीत आ.केराम यांनी पूरक नळ योजना, नळ योजना विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर घेणे, बोर विहीर अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, जलाशयातील गाळ काढणे आदी उपाय योजनाबाबत प्रत्येक गाव निहाय गरजेनुसार मागणी घेऊन त्याआधारे संभाव्य कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे मागील वर्षी घेतलेल्या आराखड्यातील कामांचा व झालेल्या कामांबाबतच्या आढाव्याचे वाचन करून घेतले. तसेच गतवर्षीच्या पूर्ण झालेल्या कामांबाबतच्या अप्राप्त निधी विषयी सविस्तर चर्चा केली. विशेषत: तालुक्यातील टंचाई काळात केलेल्या 57 विहीर अधिग्रहणबाबतचा निधी अद्याप प्राप्त झाला नसल्याने, त्यांनी याविषयी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून निधीची मागणी करण्यास सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पा.पु.चे उपविभागीय अभियंता अमित गोविंदवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी वसंत वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पं.स. पा.पु.चे अंकुश राठोड यांनी परिश्रम घेतले होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा