विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची कॉ.गंगाधर गायकवाड यांनी घेतली भेट



नांदेड : छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) चे विभागीय आयुक्त श्री दिलीप गावडे यांची भेट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड तालुका सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी जिल्हा परिषद कार्यालयात २१ फेब्रुवारी रोजी घेतली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषदे समोर सुरु असलेल्या बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचे थकीत मानधणासाठी २० फेब्रुवारी पासून उपोषण सुरु आहे.

त्या उपोषणातील मागण्या सोडविण्यात याव्यात तसेच बोगस पूरग्रस्तांच्या यादीची चौकशी करावी आणि बोगस तयार केलेली यादी रोखण्यात यावी.

बोगस यादी तयार करणाऱ्या मनपाच्या वसुली लिपिक व तहसीलच्या तलाठी यांचेसह सर्व जबाबदार अधिकारी कर्मचारी यांचेवर फोजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.


विभागीय महसूल आयुक्त श्री दिलीप गावडे यांनी सकारात्मक उत्तर दिले असून जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना मी बोलतो असे ते म्हणाले.

परंतु दुर्दैव असे की याच दिवशी तहसीलदार नांदेड यांनी अतिवृष्टीतील पूरग्रस्तांची बोगस यादी प्रसिद्ध केली आहे.

या प्रसिद्धीस दिलेल्या पूरग्रस्तांच्या यादी मध्ये ६० टक्के बोगस पूरग्रस्तांची नावे टाकण्यात आली असून खरे पूरग्रस्त रस्त्यावर उतरून यादी रोखण्याची मागणी करणार आहेत.

तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपल्या अतिवृष्टी संदर्भाने काढलेल्या आदेशात सुस्पष्ट लिहले आहे की, नुकसानग्रस्तांचे पंचनामे करतेवेळी जीपीएस कॅमेऱ्याचा उपयोग करावा.

परंतु महापालिकेच्या आयुक्तांनी तसे न करता बोगस यादी व पंचनामे करण्याची सूट आपल्या अधिकारी कर्मचारी यांना दिली होती हे स्पष्ट झाले आहे.

कारण एकाही पूरग्रस्तांचा पंचनामा जायमोक्यावर जाऊन करण्यात आला नाही.

या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यावरच पैसे वर्ग करावेत अन्यथा विपरीत परिणाम होतील असे अनेक शहरातील खऱ्या पूरग्रस्तांचे म्हणणे आहे.


तहसीलदार यांनी ही बोगस यादी बँकेला पाठवू नये व जिल्हाधिकारी यांनी या अपहार प्रकरणी स्वतः लक्ष घालून खऱ्या पूरग्रस्तांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन अजून तीव्र होणार आहे.

मागील सहा महिन्यापासून मनपा व जिल्हाधिकारी कार्यालया समोर पूरग्रस्तांचे सीटू व जमसं च्या नेतृत्वात अखंड साखळी उपोषण सुरु आहे.

लवकरच लाल बावटा आपला हुकमी एक्का काढून या भ्रष्टाचार प्रकरणी तिसरा डोळा उघडणार असून नंतर करोडो रुपये हडप करणाऱ्या या भ्रष्ट यंत्रनेस धडा शिकवणार असल्याचे मत माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

कॉ. गंगाधर गायकवाड 

सचिव : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,

नांदेड तालुका कमिटी.

मो. 7709217188

दि. 22 फेब्रुवारी 2025

========================

टिप्पण्या