मुंबई दि.१६ : आपल्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाचे यशस्वीपणे लक्ष्य गाठणा-या भारतीय कामगार सेना महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने येत्या १९ रोजी चिपळूण येथे दुपारी २ वाजता लक्ष्मीबाई मारुतराव बांदल सभागृहात कोकण विभागीय कामगार मेळावा संपन्न होत आहे.
अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते,पुणे शहर संपर्क प्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर भूषविणार
असून प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपनेते आमदार भास्करराव जाधव,उपजिल्हा प्रमुख प्रतापराव शिंदे उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी प्रादेशिक कामगार शिक्षण मंडळाचे माजी संचालक सिध्दार्थ मोरे,सानिका केमिकल कंपनीचे महाव्यवस्थापक दीपक मोरे, आणि आंबेकर श्रम संशोधन संस्थाचे संचालक जी.बी.गावडे उपस्थित राहून आजच्या कामगार विषयक प्रश्नावर मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने,सचिनभाऊ अहिर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली राज्यातील संघटीत तसेच असंटित कामगारांना न्याय मिळवून देण्यात लक्षणीय यश मिळविले आहे,भविष्यातील संकटावर संघटितपणे लढा देण्यासाठी हा राज्यस्तरीय कामगारांचा मेळावा पार पडत आहे,असे संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी मेळाव्या मागील उद्देश स्पष्ट करताना म्हटले आहे.
मेळाव्याला राज्यभरातील विविध कारखाने आणि आस्थापनातील प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. मेळाव्यापूर्वी सचिनभाऊ अहिर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची सभा पार पडेल.सचिनभाऊ अहिर कार्यकारिणीत तसेच मेळाव्यात आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या पुढील वाटचाली विषयी ठाम भूमिका मांडतील.
कार्यकारीणीमध्ये, केंद्र सरकारने कामगार हिता विरूध्द संमत केलेले नवीन कामगार कायदे दुरुस्त करा ,कामगार राज्य विमा योजनेचा लाभ तळागाळातील संघटित व असंघटित कामगारांना मिळालाच पाहिजे,भविष्य निर्वाह निधी अंतर्गत कामगारांना मासिक पेन्शन किमान ३००० रूपये पर्यंत वाढवावी आणि प्रत्येक दोन वर्षाने या रकमेत विर्षिक वाढ करण्याची तरतूद करावी,कामगारांना निवृत्ती नंतरचे आयुष्य सुख-समाधानाने जगता यावे यासाठी ग्रॅच्युइटी कायद्यात दुरुस्ती करून १५ दिवसा ऐवजी ३० दिवसाची ग्रॅच्युइटी मिळावी, कंत्राटी कायद्यात सुधारणा करावी आणि कंत्राटी कामगारांना कायम कामगारांच्या बरोबरीने वेतन व इतर फायदे मिळावेत आदी मागण्या ठरावा द्वारे करून,त्या कडे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सर्वच पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.***

COMMENTS