नांदेड:(दि.१४ ऑगस्ट २०२२) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, अंतर्गत सहाय्यक सं...
नांदेड:(दि.१४ ऑगस्ट २०२२)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, अंतर्गत सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग,नांदेड, कै. रामलिंगअप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालय, तेर व इतिहास विभाग,यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सातवाहनकालीन तेर पुरावशेषांचे छायाचित्र प्रदर्शन यशवंत महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. शारदा भवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारिणी सदस्य श्री.नरेंद्र चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमास पुरातत्व विभाग, नांदेडचे सहाय्यक संचालक श्री. अमोल गोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, श्री. सुरेश जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. प्रभाकर देव यांनी उद्घाटक म्हणून बोलतांना, तगरपूर आधुनिक तेर ही प्राचीन भारतात जगभर प्रसिद्ध बाजारपेठ होती. तेरचा मराठवाड्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा असून सातवाहनाची राजधानी प्रतिप्ठान (पैठण), तसेच भोगवर्धन(भोकरदन) व तगरपूर (तेर) ही मराठवाड्यातील प्रसिद्ध बाजापेठा होत्या. तेरचा रोमन साम्राज्याशी व्यापार सुरू होता त्यामुळे सातवाहनकालीन तेर हे प्राचीन भारताचे वैभव होते; असे प्रतिपादन केले. पहिल्या शतकात लिहिलेले 'पेरीपल्स आँफ इरथ्रियन सी' या प्रवासवर्णात तेर, भोकरदन, पैठण यांचा उल्लेख आलेला आहे. प्राचीन काळात मराठवाडा हा समृद्ध असून प्राचीन रोमन साम्राज्य व सातवाहन साम्राज्य हे समकालीन होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हस्तीदंती या भागात सापडतात. स्थापत्याचा अभ्यास करतांना धार्मिक बाबी बाजूला ठेवून अभ्यास करणे आवश्यक आहे; असे त्यांनी प्रतिपादन केले. चोल, चेल, पांडे, सातवाहन काळाचा सविस्तर अभ्यासक्रमात समावेश करून तो विद्यार्थ्यांना शिकवला जाणे आवश्यक आहे. कै. रामलिंगअप्पा लामतुरे या सामान्य मानसांनी तेर येथील पांढरीच्या मातीखालील पुरावशेषांचा संग्रह केला त्यांचे हे खुप मोठे योगदान आहे.
यानंतर पुरातत्त्व विभाचे सहाय्यक संचालक श्री. अमोल गोटे यांनी बोलतांना, तेरचा हा समृद्ध वारसा विद्यार्थ्यांना पाहता यावा म्हणूनच पहिल्यांदा तेरच्या बाहेर याचे छायाचित्र प्रदर्शन करण्यात येत आहे तसेच त्यांनी पुरातत्त्व विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामाची देखील माहिती दिली. तेर येथे करण्यात आलेली आठ उत्खनने, त्यात मिळालेली अवशेष यांची सविस्तर माहिती दिली.
यानंतर प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना श्री.नरेंद्र चव्हाण यांनी, दख्खनचा समृद्ध वारसा विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा; अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रावसाहेब शेंदारकर यांनी बोलतांना, मराठवाड्यातील तेर येथे असलेले अवशेष मौल्यवान असून विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करणे आवश्यक आहे; असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, यशवंत महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी असे विविध कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग ही ऐतिहासिक छायाचित्र प्रदर्शनी आहे. इतिहास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या सातवाहन कालीन अवशेषांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे यांनी केले तर आभार डॉ. कामाजी डक यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभागातील डॉ.संगिता शिंदे, डॉ.साईनाथ बिंदगे ,प्रा.डी.जी.चव्हाण, प्रा.शितल सावंत, प्रा.साईनाथ गायकवाड, प्रा.सचिन निळकंठे,प्रा.हनुमंत कचरे, प्रा.शिवाजी ताटे प्रा.सोनाळे तसेच पुरातत्त्व विभागातील श्री.नरसिंग चिट्टमवार, श्री. प्रभाकर जलदेवार, श्री.अतुल चिट्टमवार, यांनी परीश्रम घेतले.

COMMENTS