मुंबई दि.१५: भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास रोमहर्षक, चित्तथरारक आणि त्यागमयी असून तो अधिकाधिक युवापिढीने पुढे न्यावा,अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी येथे ध्वजारोहण प्रसंगी कामगार आणि विद्यार्थ्यांपुढे बोलतांना दिली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघही यंदा अमृतमहोत्सवी वर्षातून वाटचाल करीत आहे. राष्ट्रीयत्वाला सर्वाधिक प्राधान्य देणा-या संघटनेने ९ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागविल्या आहेत,यांची आठवण करून देऊन,देशाच्या ७५ वर्षाच्या वाटचालीचा दैदिप्यमान इतिहास उलगडून दाखवितांना श्री.अहिर म्हणाले,स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात साधी सूईही बनत नव्हती.परंतु मेहनत आणि पराकाष्टेच्या जोरावर या देशाला सर्वबाजुने स्वयंपूर्ण करण्यात यश मिळविले गेले.हे काम केवळ गेल्या सात-आठवर्षात घडले नसून,७५ वर्षाच्या वाटचालीच्या इतिहासातील तो मैलांचा दगड मानला गेला आहे.
आज संघटनेच्या वतीने सालाबादप्रमाणे मजदूर मंझील मधील प्रांगणात सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
तत्पूर्वी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने सकाळी ८ वाजता सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने मजदूर मंझील पासून भोईवाडा,टाटा हॉस्पिटल,परेल कामगार भागातून "जी.डी.आंबेकर कॉलेज ऑफ मॅनेजमेंट"या कॅटरिंगच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजित करुन स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृतीना उजाळा देण्यात आला.यात सेवा दलाचाही मोठा वाटा होता.
ध्वजारोहण प्रसंगी बोलताना सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले,आजपर्यंत देशाने खूप काही दिले आहे.पण आता आपण देशासाठी काय करणार आहोत,याचा स्वातंत्र्याच्या अमृतम होत्सवाच्या निमित्ताने संकल्प करावयाचा आहे.याच निमित्ताने 'हर घर घर झेंडा' हा जो कार्यक्रम राबविण्यात आला त्यावर बोलताना सचिन अहिर म्हणाले, ज्यांना घर नाही त्यांनी हा संकल्प कसा पूर्ण करावा?या वंचनेकडे लक्ष दिले गेले पाहिजे! गिरणी कामगारांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान निश्चितच स्तिमित करणारे आहे.परंतु मुंबई-महाराष्ट्रासह देशातील एनटीसीच्या गिरण्यां केंद्र सरकारने पूर्ववत चालू न केल्याने,दु:खाश्रु ढाळण्याची त्यांच्यावर पाळी आली आहे.तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारने स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे महत्व जाणून तरी त्यांचे हाल संपुष्टात आणावे आणि त्यांचा रोजगार त्यांना परत मिळवून द्यावा, असेही सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले.
प्रभातफेरी उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांच्या आयोजनाखाली पार पडली.कॉलेजचे प्राचार्य केतन सारंग,सर्वश्री निवृत्ती देसाई,आण्णा शिर्सेकर,मा.नगरसेवक सुनिल अहिर,सुनिल बोरकर,जी.बी.गावडे, मिलींद तांबडे, किशोर रहाटे,शिवाजी काळे, साई निकम,विलास डांगे आदी पदाधिकाऱ्यांचे याकामी सहकार्य महत्त्वाचे ठरले.

COMMENTS