नांदेड. (विशेष प्रतिनिधी) संशयावरून एका ४५ वर्षीय विवाहितेच्या हातावर तलवारीने वार करुन गंभीर दुखापत केल्याच्या आरोपावरून पती व मुलाविरूध्द नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नांदेड भागातील मिरा नगर, वाघाळा येथील रहिवासी ललिताबाई संभाजीराव वाघमारे या आठ जून रोजी दुपारी एकवाजेचेदरम्यान, नांदेड ते उस्माननगर मुख्य रस्त्यावरील 'हडको' परिसरातील भाजीपाला बाजारातून भाजीपाला घेवून घराकडे जात होत्या. दरम्यान, उस्माननगर रोडवरील दारूचे दुकाणाजवळ त्यांचा पती व या प्रकरणातील आरोपी संभाजी पुंडलिक वाघमारे यांनी तु कुणा-कुणाला बोलतेस, असे म्हणून संशय घेवून शिविगाळ करून ललिताबाई वाघमारे यांना लाथाबुक्यानी मारहाण केली आहे. त्याचवेळी, पती संभाजीराव वाघमारे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आपले हात धरले व मुलगा शंकर संभाजी वाघमारे याने तलवारीने आपल्या डाव्या हाताच्या बोटांवर वार करून आपणास गंभीर दुखापत केली, असा आरोप ललिताबाई वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीतच नमूद असल्याचीही माहिती अधिकृत पोलीस सूत्रांनी दिली.
याप्रकरणी ललिताबाई संभाजी वाघमारे (रा. मिरानगर, वाघाळा) यांनी दिलेल्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात उपरोक्त दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक पो. कॉ. ज्ञानेश्वर गव्हाणकर हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS